श्रेणी सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन संधी
जून-जुलैमध्ये पहिली ; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ः सर्व विषयात उत्तीर्ण होऊनही समाधानकारक गुण न पडल्यामुळे जे विद्यार्थी श्रेणी, गुण सुधारण्यासाठी परीक्षेला बसू इच्छितात अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यंदाच्या वर्षापासून तीन संधी मिळणार आहे.
यापूर्वी जून-जुलै २०२५ फेब्रुवारी, मार्च २०२६ व जून-जुलै २०२६ मध्ये होणाऱ्या परीक्षेला बसता येणार आहे. जून-जुलै २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.
बारावी परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय मिळालेले गुण व माहितीची प्रत संकेतस्थळावरून प्रिंट काढून घेता येणार आहे. त्याचबरोबर यंदाच्या वर्षापासून प्रथमच डीजी लॉकर अॅपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सुविधा विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी ६ ते २० मेपर्यंत ऑनलाईन पद्धतीचे अर्ज करता येणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरता येणार आहे. फेब्रुवारी-मार्च २०२५ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मुल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसात पुनर्मुल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून ऑनलाइन अर्ज शुल्कासह सादर करावा. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मुल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी विभागीय मंडळांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुनर्परिक्षार्थी व श्रेणीनुसार विद्यार्थ्यांसाठी मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन आवेदनपत्र भरून घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
जून-जुलै २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या अर्ज प्रक्रियेबाबतचा अधिकृत कार्यक्रम मंडळाने जारी केला असून, संबंधित सर्व कनिष्ठ महाविद्यालये, विद्यार्थी आणि पालकांनी ही माहिती लक्षात घ्यावी. ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आणि सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी ही संधी लक्षात घेऊन वेळेत अर्ज भरावेत, असे आवाहन मंडळाने केले आहे.