आयपीएल 2025 दरम्यान क्रिकेट वर्तुळात टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याची चर्चा रंगत होती. या अशा चर्चा सुरु असताना टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने 2 दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे इंग्लंड दौऱ्याची चर्चा बाजूला राहिली आणि रोहितच्या निवृत्तीचा गाजला. रोहितने धोनी पॅटर्नमध्ये तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. रोहितने याआधीच टी 20I क्रिकेटला अलविदा केला आहे. त्यामुळे रोहित शर्मा आता फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. रोहितच्या निवृत्तीनंतर सोशल मीडियावर पोस्टचा महापूर पाहायला मिळाला.
रोहितच्या निवृत्तीनंतर अनेक आजी माजी सहकाऱ्यांनी त्याच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्ग्जांनी रोहितला 13 वर्ष केलेल्या कसोटी क्रिकेटच्या सेवेसाठी शुभेच्छा दिल्या. मात्र माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरने रोहितवर निशाणा साधला आहे. मांजरेकरने रोहितच्या फिटनेस आणि कसोटी क्रिकेटमधील गेल्या काही सामन्यांमधील धावा यावर भाष्य केलं आहे. मांजरेकरने रोहितवर एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन टीका केलीय.
“त्याने (रोहितने) गेल्या 15 टेस्ट इनिंग्समध्ये 164 रन्स केल्या. रोहित 15 पैकी 10 डाव बांगलादेश आणि न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात खेळला. रोहितची सरासरी त्या दरम्यान 10.09 अशी राहिली. रोहितच्या फिटनेससह ओपनर म्हणून त्याचे दिवस संपले आहेत. त्यामुळे….”, अशा शब्दात मांजरेकरने रोहितवर निशाणा साधत फिटनेस आणि फॉर्मवरुन घणाघाती टीका केली आहे. संजय मांजरेकरने रोहित शर्माच्या गेल्या काही डावातील आकडे दाखवून त्याच्यासाठी कसोटी क्रिकेटमध्ये काही शिल्लक राहिलं नसल्याचं दाखवून दिलं.
संजय मांजरेकरची एक्स पोस्ट
दरम्यान रोहित शर्मा याने व्हाईट बॉलमध्ये केलेल्या झंझावाती कामगिरीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी देण्यात आली होती. रोहितने 2013 साली कोलकातामधील ईडन्स गार्डनमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. रोहितने तेव्हापासून कसोटी कारकीर्दीतील 67 सामन्यांमध्ये 40.57 च्या सरासरीने 4 हजार 301 धावा केल्या. रोहितची 212 ही एका डावातील सर्वोच्च धावसंख्या ठरली. रोहितने एकमेव द्विशतकासह 12 शतकही झळकावली. तसेच हिटमॅनने 2 विकेट्सही घेतल्या.