सोलापूर : प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेल्या संशयित मनीषा मुसळे- माने यांच्या जामीन अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी सरकार पक्षाने १७ मेपर्यंत मुदत मागितली आहे. त्यामुळे जामिनावरील सुनावणी लांबली असतानाच पोलिसांनी मनीषा यांची कोठडी मागितली आहे. पोलिस उद्या (शनिवारी) नाहीतर मंगळवारी (ता. १२) मनीषा यांना न्यायालयात हजर करतील, असे सूत्रांनी सांगितले.
पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत तपास अधिकाऱ्यांना मनीषा यांच्याकडून ठोस असे काहीच हाती लागले नाही. त्यांच्या घराची झडती घेतल्यावर देखील पोलिसांना काहीही मिळाले नाही. कोठडीत केलेल्या तपासात त्यांच्याकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे सध्या मनीषा यांच्याकडे अधिक तपास करून काहीही निष्पन्न होणार नसल्याचे कारण देत पोलिसांनी त्यांच्या १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. या १४ दिवसांत पोलिसांना निश्चितपणे काहीतरी ठोस पुरावे मिळतील आणि मनीषा यांना पुन्हा कोठडीत घेतले जाईल, असा सर्वांनाच विश्वास होता; पण तसे झालेच नाही.
आता मनीषा यांच्या जामीन अर्जावर सरकार पक्षाला न्यायालयात म्हणणे मांडण्यासाठी कागदपत्रे देण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनीच मुदत मागितली आहे. त्यामुळे तपास अजूनही प्राथमिक अवस्थेतच असल्याचा दबका आवाज पोलिसांमधूनच ऐकू येत आहे. आता मनीषा यांना न्यायालयात हजर केल्यावर पोलिसांनी २५ दिवसांत नेमका काय तपास केला आणि आणखी कोणत्या मुद्द्यांवर तपास करायचा राहिला आहे, या बाबी समोर येणार आहेत. त्यावेळी मनीषा यांचे वकील प्रशांत नवगिरे यांचा युक्तिवाद महत्त्वाचा ठरणार असून, त्याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
‘अर्थ’च्या मुद्द्यावरच तपासाचा भर
रुग्णालयातील आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात मनीषा मुसळे- मानेंचा सखोल तपास करायचा आहे. त्यासाठी न्यायालयीन कोठडीतील मनीषा यांना पुन्हा पोलिस कोठडी मिळावी म्हणून पोलिसांनी न्यायालयात प्रोडक्शन वॉरंटसाठी अर्ज केला होता. तो अर्ज न्यायालयाने मंजूर केला असल्याने मध्यवर्ती कारागृहातून मनीषा यांना न्यायालयात हजर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पोलिस कोठडीत घेऊन मनीषा यांच्याकडे पुन्हा एकदा पोलिस आर्थिक मुद्द्यांवर तपास करणार आहेत. त्यामुळे डॉ. वळसंगकर यांनी मनीषा यांच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या कारणामुळे आत्महत्या केली का, असा नवा प्रश्न उपस्थित झाला आहे.
जनसामान्यांच्या मनात आहेत ‘हे’ प्रश्न...
डॉ. वळसंगकर यांच्या मोबाईलच्या ‘सीडीआर’मध्ये नेमके काय आढळले, त्या लोकांकडे चौकशी केली का?
डॉ. शिरीष, डॉ. उमा व डॉ. अश्विन यांच्यासमोर रुग्णालयात फाडलेल्या चिठ्ठीचे तुकडे गेले कोठे?
कोट्यवधींची प्रॉपर्टी असलेले डॉ. वळसंगकर १७ वर्षांपासून कार्यरत मनीषा यांच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे आत्महत्या करतील का?
डॉक्टरांचे रुग्णालय व घरातील आत्महत्येच्या आणि आदल्या दिवशीच्या सीसीटीव्हीत नेमके काय आढळले?
डॉक्टरांच्या आत्महत्येसाठी कारणीभूत मनीषाशिवाय दुसऱ्या संशयितांची चौकशी का होत नाही?