पिंपरी, ता. १० : ट्रेडिंगच्या बहाण्याने एका व्यक्तीची ४४ लाखांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय राजेंद्र बनेकर (रा. बाणेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. एका व्यक्तीची ४४ लाख ५० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याप्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. फिर्यादी यांना विशाल व ट्रेडिंग मॅनेजर दिव्या भट यांनी एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर एका बनावट कंपनीचे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यातून शेअर ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळेल असे सांगून फिर्यादीकडून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण ४४ लाख ५० हजार रुपये जमा करून घेतले. अॅपवर दोन कोटी रुपयांचा बनावट नफा दाखवून तो काढण्यासाठी १५ टक्के रक्कम म्हणजेच सुमारे ३० लाख सात हजार रुपयांची मागणी केली. तेव्हा फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले आणि त्यांनी तक्रार नोंदवली.
तपासादरम्यान आरोपींनी वापरलेल्या बँक खात्यांचा तपास केला असता, एका खात्यात पैसे वर्ग झाल्याचे उघडकीस आले. हे खाते अक्षय राजेंद्र बनेकर आणि गणेश चंद्रकांत थोरात यांच्या नावावर असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी पुण्यातील बाणेर परिसरातून अक्षय बनेकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता अक्षय बनेकर याने अक्षय थोरात याच्यासह जॉइंट अकाउंट काढून ते अकाउंट सायबर गुन्ह्यासाठी दिल्याचे सांगितल्याने बनेकर याला अटक करण्यात आली.
---