भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी शनिवारी (10 मे) संध्याकाळी शस्त्रसंधीचा निर्णय घेतला गेला. मात्र, त्यानंतरही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्याचा आरोप भारतानं केलाय. वाचा.
आज दिवसभरातील अपडेट इथे वाचा :
अमृतसरमध्ये अजूनही रेड अलर्टपंजाबमधील अमृतसरमध्ये रात्री उशिरा सायरनचे आवाज ऐकायला मिळाले. त्यानंतर उपायुक्त साक्षी साहनी यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या.
बीबीसीचे सहयोगी पत्रकार रविंदर सिंह रॉबिन यांच्या माहितीनुसार, सध्या अमृतसरमध्ये वीज सेवा पूर्ववत करण्यात आली आहे, पण जिल्हा अद्याप रेड अलर्टवर आहे.
साक्षी साहनी यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, नागरिकांनी घराबाहेर पडू नये, आपल्या घरातच राहावं आणि खिडक्यांपासून दूर रहावं.
"जेव्हा परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित होईल, तेव्हाच प्रशासनाकडून हिरवा सिग्नल दिला जाईल. कृपया घाबरू नका, शांतता राखा आणि प्रशासनाच्या सर्व सूचनांचे पालन करा," असंही त्या म्हणाल्या.
भारत आणि पाकिस्ताननं पूर्ण शस्त्रसंधीवर सहमती दर्शवल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये जाहीर केलं.
त्यानंतर काही वेळानं पाकिस्तानकडून या शस्त्रसंधीचं अनेकवेळा उल्लंघन झाल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं.
शस्त्रसंधीचं पाकिस्तानकडून उल्लंघन - भारतभारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेतली.
त्यात मिस्री यांनी म्हटलं, "भारत आणि पाकिस्तान यांच्यात काही तासांपूर्वी शस्त्रसंधी झाली होती, पण त्याचं पाकिस्तानकडून उल्लंघन होत आहे. त्यामुळे भारतीय सैन्यदलाकडून त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. ही अतिशय खेदाची गोष्ट आहे आणि याला पाकिस्तान जबाबदार आहे."
मिस्री पुढे म्हणाले, "पाकिस्तानने सद्यपरिस्थिती समजून घ्यावी आणि अशी घुसखोरी ताबडतोब थांबवावी.सैन्याला अशा परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी सांगितलं आहे. तसंच, पाकिस्तानने असं उल्लंघन टाळावं आणि परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्यावं."
त्याआधी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करत म्हटलं होतं की, "शस्त्रसंधीचं नेमकं काय झालं. संपूर्ण श्रीनगरमध्ये स्फोटाचे आवाज येत आहेत."
हा पाकिस्तानसाठी ऐतिहासिक विजय - शरीफमध्यरात्री पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देशाला उद्देशून भाषण केलं.
"कोणी स्वातंत्र्याला आव्हान दिलं तर आम्ही आमच्या संरक्षणासाठी काहीही करू," असं म्हणत त्यांनी भाषणाची सुरुवात केली.
पाकिस्तानवर विनाकारण आरोप केले जात असून, त्याची चौकशी व्हावी असं ते म्हणाले. गेल्या काही दिवसांत पाकिस्तावर ड्रोन हल्ले झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्यात मशिदींचं नुकसान झालं असून निरपराध लोक मारले गेल्याचा आरोपही त्यांनी केला.
शरीफ यांनी पाकिस्तानच्या लष्करानं याचा कसा सामना केला याबाबतही माहिती दिली. "आपल्या मूल्यांचं रक्षण करण्यात देश यशस्वी झाला आहे. संपूर्ण पाकिस्तानी यशस्वी झाले आहे, आपण जिंकलो आहोत. हा विजय आहे," असं ते म्हणाले.
हा पाकिस्तानसाठी ऐतिहासिक विजय असल्याचं म्हणत शरीफ यांनी कौतुक केलं. त्यांनी पाकिस्तानच्या सैन्यातील अधिकाऱ्यांची नावं घेत त्यांचं अभिनंदन केलं. देशातील विरोधी पक्षांचेही शरीफ यांनी आभार मानले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)