Virat Kohli : विराट कोहली कसोटी निवृत्तीचा निर्णय मागे घेणार? प्रेमानंद महाराजांचं माजी कर्णधार ऐकणार?
GH News May 14, 2025 03:09 PM

विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती झाल्यानंतर पत्नी अनुष्का शर्मा हीच्यासह 13 मे रोजी प्रेमानंद महाराज यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेला. विराट कोहली प्रेमानंद महाराज यांचा मोठा भक्त आहे. विराट प्रेमानंद महाराज यांचे आशीर्वाद घेण्यासाठी जात असतो. विराट आणि अनुष्का हे दोघेही मंगळवारी जवळपास 2 तास प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात थांबले. विराट आणि अनुष्का या दोघांचा प्रेमानंद महाराजांसोबतच्या भेटीचा व्हीडिओ सोशल मीडियाव व्हायरल होत आहे. अशातच विराटच्या असंख्य चाहत्यांनी प्रेमानंद महाराजांकडे विनंती केली आहे. विराटची निवृत्तीचा निर्णय मागे घेण्यासाठी मनधरणी करा, अशी विनंती क्रिकेट चाहत्यांनी प्रेमानंद महाराजांकडे केली आहे.

विराटच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. विराटने इंग्लंड दौऱ्याआधी निवृत्ती जाहीर केल्याने टीम इंडियाची ताकद कमी झाली आहे. त्यामुळे विराटने त्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती केली जात आहे. आता विराट चाहत्यांनी एक पाऊल पुढे टाकलं आहे. विराटला त्याचा निर्णय बदलण्यासाठी भाग पाडावं, यासाठी चाहत्यांनी थेट प्रेमानंद महाराज यांच्याकडे गळ घातली आहे. विराट प्रेमानंद महाराजांचा मोठा भक्त आहे. त्यामुळे प्रेमानंद महाराजांनी विराटला निवृत्ती मागे घेण्यास सांगितली तर तो तसं करेल, असा विश्वास चाहत्यांना आहे. “गुरुजी तुम्हीच विराटला समजवा की निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा”, असं सौरभ नावाच्या युजरने म्हटंलय.

“विराटने जेव्हा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तेव्हा माझ्या क्रिकेट कथेतील सर्वात सुंदर अध्यायाचा शेवट झाल्यासारखं वाटलं. मी विराटला कसोटी पदार्पणापासून पाहत आहे. विराटच्या डोळ्यातील तेज, प्रत्येक रनसाठी लढण्याची जिद्द”, असं म्हणत एका युजरने विराटच्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला आणि आपलं त्याच्यावर किती प्रेम आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

विराट चाहत्यांची प्रेमानंद महाराज यांना गळ

विराटचा टेस्ट क्रिकेटला टाटा बाय-बाय

दरम्यान विराट कोहली याने सोमवारी 12 मे रोजी इंस्टाग्रामवर पोस्ट करत टेस्ट क्रिकेटला अलविदा केला. विराटची कसोटी कारकीर्द 14 वर्षांची राहिली. विराटने या दरम्यान 2014 ते 2022 असे एकूण 8 वर्ष भारतीय संघातं नेतृत्वही केलं. विराटने कसोटी कारकीर्दीतील 123 सामन्यांमधील 210 डावांमध्ये 30 शतकं आणि 31 अर्धशतकांसह 9 हजार 230 धावा केल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.