Amazon, Flipkart: भारत-पाकिस्तान दरम्यान सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानशीसंबंधीत व्यापारावर भारतानं निर्बंध घातला आहे. त्यामुळं याबाबतची कोणत्याही कृती भारतीय कंपन्यांकडून होता कामा नये असे निर्देश सरकारकडून देण्यात आले आहेत. दरम्यान, तरीही अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांच्यासह भारतात व्यवसाय करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांना सरकारनं नोटीस पाठवली आहे. या दोन्ही वेबसाईटवर पाकिस्तानी झेंडे विकले जात असल्याचं निदर्शनास आलं आहे.
केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट केलं की, "सीसीपीएनं पाकिस्तानी ध्वज आणि संबंधित वस्तूंच्या विक्रीबद्दल अमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट, उबई इंडिया, एट्सी, द फ्लॅग कंपनी आणि द फ्लॅग कॉर्पोरेशन यांना नोटिसा बजावल्या आहेत. अशी असंवेदनशीलता खपवून घेतली जाणार नाही. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मना अशा सर्व सामग्री त्वरित काढून टाकण्याचे आणि राष्ट्रीय कायद्यांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत"