संचमान्यता कार्यवाही थांबवण्यासाठी साकडे
esakal May 17, 2025 02:45 AM

संचमान्यता कार्यवाही
थांबवण्यासाठी साकडे

शिक्षक समितीचे प्रशासनाला निवेदन

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १६ ः सिंधुदुर्गातून दाखल याचिकेमध्ये संचमान्यतेच्या शासन आदेशास अंतरिम स्थगिती दिल्याने त्याबाबतची कार्यवाही थांबविण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्गने जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे. याबाबतचे निवेदनही प्रशासनास सादर करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील १९३ शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयात १५ मार्च २०२४ च्या संचमान्यता आदेशाविरोधात याचिका दाखल केली आहे. याची सुनावणी ६ मे रोजी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देताना सर्व याचिकाकर्त्यांना जैसे-थे परिस्थिती ठेवण्यासाठी सांगितले आहे. तसेच याचा जिल्हांतर्गत बदलीवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे. तरी न्यायालयाचा पुढील आदेश होईपर्यंतच कोणत्याही याचिकाकर्त्यांना संचमान्यतेच्या १५ मार्च २०२४ च्या आदेशाने अतिरिक्त ठरवता येणार नाही. याची काळजी घ्यावी, असे निवेदन शिक्षक समितीने मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर व प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांना संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस व सरचिटणीस तुषार आरोसकर यांनी सादर केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.