- शिवराज पिंपुडे
‘रीवॉच’ ही पूर्वोत्तर भारतातील एक प्रमुख संशोधनसंस्था आहे. अरुणाचल प्रदेशातील दिबांग व्हॅली जिल्ह्यातील रोईंग या शहरातून संस्थेचं कार्य चालतं. स्थानिक समुदायांना सक्षम करण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करणे, हे या संस्थेचं मुख्य काम. या कामाचाच एक भाग म्हणून जनजातींशी संबंधित एका उत्तम संग्रहालयाची निर्मिती संस्थेनं केली आहे. उद्याच्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त (ता. १८) या संग्रहालयाविषयी...
रीवॉच ही ईशान्य भारतातील एक प्रमुख संशोधनसंस्था आहे. भारतातील आणि जगातील जनजातींशी संबंधित एका उत्तम संग्रहालयाची निर्मिती संस्थेनं केली आहे. संस्थेचे संस्थापक आणि संग्रहालयाचे निर्माते विजय स्वामी याची ओळख ‘पीपल्स म्युझियम’ अशी करून देतात.
याचं स्पष्टीकरण करताना त्यांनी सांगितलं, ‘इथली प्रत्येक वस्तू पूर्वांचलातील जनजातींच्या लोकांनी स्वेच्छेनं दिली आहे. इथली एकही गोष्ट विकत घेऊन मांडलेली नाही...’ संग्रहालयात प्रवेश केल्यावर साधारण एका खोली एवढा भाग मोकळा सोडण्यात आला आहे. या भागाच्या तीन बाजूंना तीन दालनं आहेत.
त्यातील एक दालन पूर्वांचलातील जनजातींसाठी, दुसरं दालन अरुणाचलातील जनजातींसाठी तर तिसरं जगभरातील जनजातींसाठी समर्पित आहे. या तिसऱ्या दालनाचं काम अजून सुरू आहे. केनिया, स्पेन, इंडोनेशिया, मेक्सिको इत्यादी देशांतून वस्तू येण्यास सुरुवात झाली आहे.
संग्रहालयाच्या सुरुवातीच्या मोकळ्या भागात भारतीय प्राच्यविद्येशी संबंधित गोष्टी बघायला मिळतात. चौदाव्या शतकात शंकरदेवांनी स्थापन केलेल्या नामघरांची प्रतिकृती, दिमासा आणि कचारी राजवंशांच्या राजवाड्यांचे अवशेष, आहोम राजवटीतील नाणी आणि शिक्के यांची प्रतिरुपे, मेघालयात पूर्वजांच्या स्मरणार्थ उभे केले जाणारे दगडी शिल्प अशा अनेक गोष्टी या ठिकाणी मांडून ठेवल्या आहेत.
ईशान्य भारत आणि अरुणाचलातील दालनातून घरगुती वापराच्या असंख्य वस्तू, दागिन्यांचे, शस्त्रांचे, वाद्यांचे नाना प्रकार, वेशभूषेचे विविध नमुने आपल्याला बघता येतात. जवळपास सर्व जनजातींमधून सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या ‘दाओ’ एक लांब तलवारीसारख्या शस्त्रापासून ते दगड मारता येणाऱ्या धनुष्यापर्यंतची शस्त्रांची विविधता इथे बघायला मिळते.
मिथुन या प्राण्याच्या शिंगापासून बनवलेले वाद्य प्रसिद्ध आहे या भागात. मिथुन म्हणजे बैल आणि म्हैस यांच्या संयोगातून तयार झालेला प्राणी. खाण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. या भागात लग्नाच्या वेळी मुलाकडचे लोक मुलीकडच्यांना मिथून प्राणी भेट देतात. त्यामुळे मुलगी झाल्यावर लग्नात मिथून मिळणार या कल्पनेने लोकांना अतीव आनंद होतो.
वाघाच्या दातांचा पट्टा
सर्व जनजातींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार विधी करणाऱ्या गुरूला खूप महत्त्व असतं. ‘इदु मिशमी’ जमातीत अशा व्यक्तींना ‘इगु’ असं म्हटलं जातं. यांच्यात अनेक प्रकारच्या शक्ती असल्याची समाजाची मान्यता असते. संग्रहालयात एका इगुचा पुतळा उभा करून हुबेहुब सजवण्यात आला आहे. त्याच्या हातात डमरू आहे.
कमरेला घंटांची माळ आहे आणि खांद्यावर एक पट्टा आहे, वाघाच्या तब्बल ४० दातांपासून बनवलेला पट्टा! अर्थातच हे सर्व साहित्य लोकांनी दिलंय. ‘इदू मिशमी’ आणि ‘आदि’ जनजातीचा एकेक देखावा संग्रहालयात उभा करण्यात आला आहे. इदू मिशमीच्या दोन महिला झोपडीच्या बाहेर बसून कापड विणताना दाखवल्या आहेत. हुबेहूब पोशाख, दागिने घातल्याने हा देखावा अगदी खरा वाटतो.
दुसऱ्या देखाव्यात ‘आदि’ जनजातीचे दोघेजण शिकारीला निघाले आहेत असं दाखवलं आहे. यांचे पुतळे तर विजयजींनी उभे करून घेतले. पण त्यांना सजवण्यासाठीचं जे साहित्य लागते ते काही त्यांना मिळालं नाही. त्यामुळे या दोन पुतळ्यांना त्यांनी केवळ कमरेला कापड गुंडाळून ठेवून दिले.
जेव्हा या जनजातीचे लोक संग्रहालय बघायला यायचे तेव्हा त्यांना वाईट वाटायचं की दुसऱ्या देखाव्यातील महिलांना छान सजवलं आहे. पण आमच्या लोकांना फक्त कमरेला कापड गुंडाळलं आहे. ते नाराजी व्यक्त करायचे. त्यावर विजयजी म्हणायचे, ‘त्यांना सजवणं हे तुमचं काम आहे’. मग या जनजातीच्या महिलांनी हे मनावर घेतलं.
एके दिवशी सकाळी महिलांचा एक मोर्चा संग्रहालयात आला. सगळं साहित्य सोबत घेऊनच आल्या या महिला. आणि काही तासातच त्यांनी या दोनही पुतळ्यांना सजवलं. म्हणजे रानडुकराचे दात आणि हॉर्नबिल पक्ष्याची चोच असलेल्या मुकुटापासून ते हातापायातले दागिन्यांपर्यंत.
या दोन्ही देखाव्यांच्या मागे त्रिमितीय चित्रं लावली आहेत. ती काढली आहेत प्रसिद्ध चित्रकार गौतम सरकार यांनी. खास या कामासाठी विजयजींनी त्यांना निमंत्रण धाडलं आणि तेही वेळ काढून आले. चित्रे काढण्यासाठी या दोन्ही जनजातींची गावे त्यांनी फिरून बघितली. चौकस निरीक्षण केलं आणि मग ही चित्रे रेखाटली.
आम्ही संग्रहालय पाहत असताना संग्रहालयाचे व्यवस्थापन बघणारी नोया आली. विजय सरांना कोणीतरी भेटायला आल्याचा निरोप तिने दिला. दिबांग व्हॅलीतील अनिनी गावातून (संग्रहालयापासून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावरील गाव) राजू पुलू आणि त्याचा मित्र विजयजींना भेटायला आले होते. त्यांच्या गावातील एका थडग्यातून एक भांडं बाहेर आलेलं त्यांना दिसलं.
ते भांडं संग्रहालयात द्यायला ते दोघे जण इतक्या लांबचा प्रवासकरून आले होते. जणू काही ‘पीपल्स म्युझियम’चं प्रात्यक्षिकच ते आम्हाला देत होते. भांडं थडग्याच्या बाहेर आलं होत ही गोष्ट काही आमच्या पचनी पडली नाही. रामभाऊंनी न राहवून विचारलं, ‘सर, थडग्यात भांडं पण पुरतात का?’ यावर विजयजी हसले.
आणि संग्रहालयातील एका भागाकडे ते आम्हाला घेऊन गेले. त्या ठिकाणी जमिनीखाली एक खोली तयार करण्यात होती. एकदम सीलबंद खोली होती ती. खोलीला वरून काच लावली होती. त्यामुळे आतील सर्व गोष्टी व्यवस्थित बघता येत होत्या. त्या खोलीत एका म्हातारीचा पुतळा खाटेवर झोपवण्यात आला होता. आणि त्या म्हातारीच्या अवतीभवती सर्व वस्तू नीट मांडून ठेवल्या होत्या.
विविध प्रकारची ध्यान्यं, बिस्किटे, ताट, वाटी, चमचा सबकुछ होत त्या खोलीत. ‘ही घराची रचना दाखवली आहे का?’ रामभाऊंनी विचारलं. ‘अगदी बरोबर. फक्त हे मेल्यानंतरच घर आहे.’ ‘म्हणजे?’ आम्ही दोघांनी एकाचवेळी विचारलं. ‘ती व्यक्ती ज्या ज्या वस्तू वापरत होती, ज्या ज्या वस्तू तिला जगताना आवश्यक होत्या आणि ज्या ज्या वस्तूंची तिने इच्छा केली होती त्या सर्व त्या मृत शरीरासोबत पुरल्या जातात.
पुनर्जन्म होईपर्यंतच्या प्रवासात या सर्व वस्तू तिला उपयोगी पडतील या भावनेनं. मृत शरीराची हाताची घडी घालून मुठीत पैसा पण ठेवला जातो. पुढच्या आध्यात्मिक प्रवासात तहान लागली तर पाणी घेण्यासाठी वापरता यावा म्हणून. आधी वस्तू ठेवल्या जातात मग मृत व्यक्तीला ठेवलं जात.’ विजयजी सांगत होते. आम्ही थक्क होऊन ऐकत होतो.
हिमालय निर्मितीची रहस्ये
संग्रहालयात हिमालयाच्या निर्मितीची रहस्येही उलगडून दाखवली आहेत. अरुणाचल प्रदेशच्या विविध भागात आढळणारे खडक, खनिजे, वनस्पती आणि प्राण्याचे जीवाश्म यांचे नमुनेही संग्रहालयात बघता येतात. संग्रहालयाच्या एका भागात खुद्द दलाई लामा यांनी बौद्ध धर्माविषयी दिलेले ३३० ग्रंथ ठेवण्यात आले आहेत.
इथल्या प्रत्येक गोष्टीची एक गोष्ट आहे. आणि ती विजयरावांकडून ऐकण्यातच गंमत आहे. ‘हे केवळ वस्तूंचं भांडार नाही. तर ही एक शिकण्याची जागा आहे, अध्ययन केंद्र आहे. युवक युवतीनी इथ यावं आणि जगातल्या प्राचीन संस्कृतीचा, भारतीय संस्कृतीचा अभ्यास करावा. त्यांच्यातील साम्यस्थळं शोधावीत आणि त्यातून मानवाच्या एकत्त्वाचा अनुभव घ्यावा.’
संग्रहालयामागचा विचार विजयजी उघडून सांगत होते. थोडंसं विजयजींविषयी... हे मूळचे सोलापूरचे. तरुण वयात काहीतरी वेगळं केलं पाहिजे या इच्छेने सतत अस्वस्थ असायचे. एके दिवशी ‘सीमावर्ती भागात काम करणारे युवा हवेत,’ ही विवेकानंद केंद्राची वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेली जाहिरात वाचली आणि विजयजी थेट कन्याकुमारीत दाखल झाले.
केंद्रातले रीतसर प्रशिक्षण झाल्यावर अरुणाचल प्रदेशात शिक्षक म्हणून रुजू झाले. पुढची पंधरा वर्षे विवेकानंद केंद्र देईल तिथे देईल त्या प्रकारच्या जबाबदाऱ्या विजयाजींनी यशस्वीपणे पार पाडल्या. २००४ मध्ये अमेरिकेची फुलब्राईट शिष्यवृत्ती त्यांना प्राप्त झाली.
तेथील वास्तव्यात विजयाजींना नवीन स्वप्न पडलं आणि या स्वप्नाचंच मूर्त स्वरूप म्हणजे रिवॉच ही संस्था. गेली सुमारे ३५ वर्षे महाराष्ट्राचा हा सुपुत्र अरुणाचलात ठाण मांडून येथील जनजातींसाठी अहोरात्र कार्यरत आहेत. त्यामुळेच रीवॉच हे अरुणाचलातील एक तीर्थस्थळ आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
(लेखक मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे कोषाध्यक्ष आहेत.)