नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा भंडाफोड करण्यासाठी परदेशांमध्ये जाणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांवरून सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये राजकारण पेटले आहे. केंद्र सरकारने काँग्रेस नेते शशी थरूर यांच्याकडे एका शिष्टमंडळाचे नेतृत्व दिल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडूनही आणखी चार नेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तसेच “सरकार पक्षाला न विचारता कोणतेही नाव परस्पर ठरवू शकत नाही,’’ असा जोरदार आक्षेप काँग्रेसकडून नोंदविण्यात आला.
सरकार यावर राजकारण करत असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे. विरोधकांच्या या टीकेला सरकारनेही प्रत्युत्तर दिले आहे. ‘काँग्रेसच्या यादीत थरूर यांचे नाव नसणे यामागे राहुल गांधींना वाटणारी असुरक्षितता आहे की हायकमांडची असहिष्णुता आहे,’ अशी खिल्ली भाजपकडून उडविण्यात आली.
संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी आजच माजी मंत्री रविशंकर प्रसाद, काँग्रेसचे नेते शशी थरूर, संयुक्त जनता दलाचे संजय झा, भाजपचे वैजयंत जय पांडा, ‘द्रमुक’च्या कनिमोळी, राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे, शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे हे परदेशांमध्ये जाणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील अशी घोषणा केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी माध्यम सरचिटणीस जयराम रमेश यांना लगेच पक्षातर्फे माजी मंत्री आनंद शर्मा, लोकसभेतील उपनेते गौरव गोगोई, जम्मू-काश्मीरचे प्रभारी सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार नासीर हुसेन आणि पंजाबचे खासदार राजा अमरिंजरसिंग वारिंग यांची नावे सरकारला कळविण्यास सांगितल्याचे समजते. समाजमाध्यमांवर तशी चर्चाही रंगली होती. तसेच, पत्रकारांशी बोलताना रमेश यांनी सरकारच्या यादीमध्ये काँग्रेसने दिलेल्या नावांचा समावेश नसल्याबद्दलची नाराजी जाहीरपणे बोलून दाखविली.
रिजिजू यांचा खर्गे अन् गांधींशी संवाद‘‘मंत्री किरेन रिजिजू यांनी यासंदर्भात राज्यसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींशी संपर्क साधला होता. दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय करून कालच चार नावे कळविली होती. त्यानंतर सरकारतर्फे शिष्टमंडळाबाबत घोषणा करण्यात आली,’’ असे जयराम रमेश म्हणाले. शशी थरूर हे काँग्रेसचे प्रतिनिधी नाहीत काय? असे विचारले असता पक्षाकडून चार नावे देण्यात आली असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. ‘‘काँग्रेसमध्ये असणे आणि काँग्रेसचे असणे यात फरक आहे,” असे सूचक विधान त्यांनी केले. तसेच सरकारने खासदारांना विचारले असले तरी संबंधित खासदाराने पक्षाकडून परवानगी घ्यायला हवी, असा इशाराही जयराम रमेश यांनी दिला.
थरूर सरकारवर फिदा, काँग्रेस मात्र नाराजभारत-पाकिस्तानमधील अमेरिकेच्या कथित मध्यस्थीच्या मुद्द्यावर काँग्रेसने सरकारविरोधात भूमिका घेतली असताना केरळमधील कॉँग्रेसचे खासदार असलेले शशी थरूर यांनी सरकारची प्रशंसा केली होती. त्यानंतर थरूर यांनी लक्ष्णरेषा ओलांडल्याची नाराजी व्यक्त करणारी टिपणीही कॉंग्रेसकडून करण्यात आली होती. असे असताना सरकारने थरूर यांना शिष्टमंडळाचे नेतृत्व दिल्यावरूनही काँग्रेसमध्ये खदखद आहे. तर, थरूर यांनी ही निवड गौरवास्पद असल्याचे म्हणताना पाच देशांमध्ये जाणार असल्याचे आणि देशहितासाठी सेवा देण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले.
तो सरकारचा अप्रमाणिकपणा : रमेशशशी थरूर यांच्या नावावरून पक्षात मतभेद असल्याचा इन्कार करताना जयराम रमेश यांनी सांगितले की पक्षाने दिलेल्या नावांचा शिष्टमंडळात समावेश होत नसेल तर हा सरकारचा अप्रामाणिकपणा आहे. ही चार नावे बदलली जाणार नाहीत. सरकारने आधीच नावे ठरविली असतील आणि केवळ औपचारिकता म्हणून खर्गे व राहुल गांधींशी संपर्क साधला असेल अशी शक्यता आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठविणे ही केवळ वरवरची उपाययोजना असून हा लक्ष विचलित करण्याचा प्रकार आहे. पाकिस्तानचा, चीनचा असलेला धोका, अमेरिकेचा दबाव यासारख्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चेसाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक व्हावी आणि संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले जावे या पूर्वीच्या मागणीचा रमेश यांनी पुनरुच्चार केला.
तृणमूल काँग्रेसही नाराजतृणमूल काँग्रेसनेही सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. शिष्टमंडळांबाबत मंत्री रिजिजू यांनी तृणमूल कॉँग्रेसचे लोकसभेतील गटनेते सुदीप बंदोपाध्याय यांच्याशी संपर्क साधला होता. त्यापार्श्वभूमीवर पक्षाच्या सूत्रांनी सांगितले, की सरकारने खासदारांना किंवा गटनेत्यांना परस्पर विचारण्याऐवजी पक्ष प्रमुखांना ( ममता बॅनर्जी) विचारायला हवे होते. सरकारने समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याशी न बोलता त्यांच्या खासदारांशी संपर्क साधला. त्यामुळे सध्या तरी तृणमूल काँग्रेस व समाजवादी पक्षाने सर्वपक्षीय शिष्टमंडळात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला असल्याचेही समजते. संसदेमध्ये कमी खासदार संख्या असूनही राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेनेकडे शिष्टमंडळाचे नेतृत्व का? असाही सवाल तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
काँग्रेसच्या यादीत थरूर यांचे नाव नसणे यामागे राहुल गांधींना वाटणारी असुरक्षितता आहे की हायकमांडपेक्षा कोणीही श्रेष्ठ असू नये ही असहिष्णुता आहे? शशी थरूर यांची वक्तृत्वशैली, संयुक्त राष्ट्रांत अधिकारी म्हणून त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि प रराष्ट्र धोरणाबाबतचे त्यांचे ज्ञान कोणीही नाकारू शकत नाही.
अमित मालवीय, भाजपच्या आयटीसेलचे प्रमुख