ढिंग टांग
इहलोकात कुणी जबरदस्त पॉवरचे ऋषीमुनी उग्र तपश्चर्या करु लागले की तिकडे स्वर्गलोकात इंद्रदेवाचे आसन डळमळत असे. मग डगमगत्या आसनावर तोल सांभाळत इंद्रदेव तातडीने कुण्या अप्सरेला बोलावून तिची तपोभंगाच्या ड्यूटीवर प्रतिनियुक्तीवर रवानगी करत असे. सदरील अप्सरा आपला कार्यभाग उरकून आयदर परत येत असे किंवा तिथेच काहीतरी नस्ती उठाठेव करुन शापाची धनीण होत असे. नरकलोकात मात्र अशी सिच्युएशन नव्हती. पण ती नुकतीच निर्माण झाली…
एकदा काय झाले की, यमराज आपल्या बर्फगार दगडी किंवा लोखंडी काटेरी सिंहासनावर (संदर्भ : पहा, गेम ऑफ थ्रोन्स) बसून हुक्कापाण्याचा आस्वाद घेत होते. ऑइल सप्लाय डिपार्टमेंटच्या व्यवस्थापकाने उकळत्या तेलाच्या कढयांमध्ये तेल कमी पडत असल्यामुळे प्रॉक्युरमेंटसाठी संबंधित अधिकाऱ्याला तंबी द्यावी, अशी विनंती केली. यमराजाने तो प्रश्न मार्गी लावला. भारतात सध्या निवडणुकीचा माहौल नसतानाही नरकात अचानक उकळत्या तेलाची मागणी कां वाढली? याची त्याने चौकशी केली असता, वेगळेच उत्तर मिळाले. पाकव्याप्त काश्मीरातून अनेक दहशतवादी नरकद्वाराशी गोळा झाले असल्याचे सांगण्यात आले.
तेवढ्यात हेडक्लार्क चित्रगुप्त हातात एक जाडजूड फाइल घेऊन आले. त्यांच्या मुद्रेवर चिंतेचे जाळे होते. यमराजांचे आणि चित्रगुप्ताचे फारसे जमत नाही. जरा काही खोडी दिसली की हा गृहस्थ थेट नरकात बदली करतो. इथे नरकात सिच्युएशन किती खराब आहे, हे त्याला माहीत का नाही? भारतातले तुरुंग परवडले, एवढे बंदी सध्या सांभाळावे लागतात. बरे त्यांना शिक्षाही बऱ्याच असतात. चौदा वर्षे विस्तवावर झोपवण्याची शिक्षा एखाद्याला असेल, तर त्याच्या एकट्यावर केवढा कोळसा खर्ची पडतो. आणायचा कुठून? इनवर्ड,आऊटवर्डच्या नस्ती आणि दैनंदिन अहवाल फाइल करुन चित्रगुप्त हात बांधून उभा राहिला.
‘‘काय चित्रगुप्तसाहेब, आमच्या राज्याची काय हालहवाल आहे? चेहेरा का पडल्याला!’’ यमराजाने विचारले. शेजारीच रवंथ करत बसलेला रेडा फिक्कन हसला. चित्रगुप्ताचा चेहरा आणखीनच पडला.
‘‘का काय जहालं, महिषा! उगा का दात काढाया लागलाईस?’’ यमराज गुर्कावले.
‘‘इच्यारा की त्यास्नीच! मोटे आले नरकाचे म्यानेजर…च्यामारी, हेडक्लार्क तो हेडक्लार्क, आव आनतोय कलेक्टरचा!’’ रेड्याने आपला सगळा चित्रगुप्तावरचा राग काढला. गेली कित्येक युगे चित्रगुप्ताने रेड्याचा ट्रावल अलौन्स अडवून ठेवलाय अशी त्याची तक्रार आहे. कोरोनाकाळातला ओव्हरटाइम अजूनही त्याला मिळालेला नाही, असा रेड्याचा दावा आहे.
‘‘सर, स्वर्गातून कम्प्लेंट आलीये की तुम्ही इथे नरकातसुद्धा काही निवडक बंद्यांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देता…स्वर्गात बोअर झालेले काही सज्जन आता आमची नरकात बदली करा, आमचं आम्ही बघू, अशी मागणी करायला लागले आहेत म्हणे!’’ चित्रगुप्ताने चिंतेचे खरे कारण सांगितले.
‘‘आपल्याकडे सोयीसुविधा? छे, मी स्वत: सगळ्या डिपार्टमेंट्रसची राऊण्ड घेतो. सगळी छळयंत्रं बऱ्यापैकी चांगल्या कंडिशनमध्ये आहेत, आपण कोणालाही त्यात कन्सेशन देत नाही, ’’ यमराजाने आश्चर्य व्यक्त केले.
‘‘इंद्रदेवांच्या दरबारात कुणीतरी इहलोकातल्याच व्यक्तीनं सॉलिड पिन मारली आहे, साहेब!’’ चित्रगुप्ताने आतली खबर दिली.
‘‘शिश्टिमच फॉल्टी म्हटल्यावर काय, सगळीकडे करप्शन आहेच!’’ रेड्याने विनाकारण मत दिले.
किंचित खाकरुन चित्रगुप्त म्हणाला, ‘‘माझी माहिती अशी आहे की, संजयाजी राऊत म्हणून कोणी पृथ्वीलोकातील मर्त्य मानवानं ‘नरकातला स्वर्ग’ या टायटलचा गोपनीय अहवाल पाठवलाय, थेट इंद्रदेवाकडे! तिथूनच सगळी गडबड झाली आहे…’’
‘‘लबाड बोलतुयास की खरं? बायलीला..,’’ असे म्हणून यमराजांनी धक्का पचवला, पण तेव्हाच त्यांचे आसन डगामगा डगामगा करू लागले.