नागपूर : वाढत्या वयाच्या मुलांमध्ये अनेक शारीरिक - मानसिक बदल होत असतात. त्या व्यतिरिक्त अभ्यासाचा दबाव असतो. स्वतःला सिद्ध करण्याची स्पर्धा असते. अनेक पालकही पाल्यांवर तुला हे जमणार नाही, असा अविश्वास दाखवतात. परिणामी विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास हरवतो. तो आत्मविश्वास परत मिळावा, अधिक वाढावा, हा ॲडव्हेंचर कॅम्पचा उद्देश असल्याचे हिमालयन एक्सकर्शेन ॲडव्हेंचर ॲकॅडमीचे संयोजक अविनाश देऊस्कर यांनी सांगितले.
अविनाश देऊस्कर स्वतः गेल्या ४० वर्षांपासून ट्रेकिंगसाठी हिमालयात जातात. त्यांनी बचेंद्री पाल यांच्यासह प्रोफेशनल ट्रेनर म्हणूनही काम केले आहे. त्यानंतर त्यांनी स्वतः ॲडव्हेंचर कॅम्पचे आयोजन करणे सुरू केले. १९९५ पासून त्यांनी आजवर ३०० हून अधिक कॅम्पचे आयोजन केले आहे. प्रत्येक कॅम्पमध्ये ४० मुले आणि त्यांच्याबरोबर १६ प्रशिक्षक असतात, हा कॅम्प १० दिवसांचा असतो.
हिमालय खुणावतो
हिमालय म्हणजे अद्भुत सौंदर्य. युवकांना हिमालयाची, तिथल्या निसर्ग सौंदर्याची ओळख व्हावी. तिथली जीवनपद्धती कळावी, संस्कृती कळावी, हा ट्रेकिंगचा उद्देश असतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ‘मी हे करू शकतो’ हा विश्वास युवकांमध्ये निर्माण होतो, असे अविनाश देऊस्कर यांनी सांगितले.
पहलगाम हल्ल्यानंतर हिमालयात
दहशतवाद्यांनी पहलगाम येथे केलेल्या हल्ल्यानंतरही ट्रेकिंगसाठी हिमालयात गेलो होतो. आम्हाला काहीही त्रास झाला नाही. उलट थोडा धोका पत्करण्याची आणि भारतीय सैन्यावर डोळे मिटून विश्वास ठेवण्याचा धडा यानिमित्ताने विद्यार्थ्यांना मिळाला. अशा घटनांमुळे पर्यटकांनीही हिमालय किंवा काश्मीरला जाणे, थांबवू नये, असा सल्लाही अविनाश देऊस्कर यांनी दिला.
युवकांमध्ये भरपूर ऊर्जा; सकारात्मक कामांमध्ये खर्च व्हावी
युवकांमध्ये भरपूर ऊर्जा असते. ती सकारात्मक कामांमध्ये खर्च व्हावी तसेच राष्ट्र उभारणीत युवकांचा हातभार लागावा, त्यांचे आरोग्य उत्तम राहावे, त्यांच्यातील नेतृत्व गुण वाढीस लागावा, हा आयोजनामागचा उद्देश असल्याचे देऊस्कर यांनी सांगितले. ट्रेकिंगमध्ये सर्व समवयस्क मुले असतात. आपोआपच त्यांना समूहजीवनाची सवय लागते. नकारात्मकता नष्ट होते. त्यांच्यातील कौशल्यांचा विकास होतो. हे युवक सक्षम होतात. वैज्ञानिक पद्धतीने त्यांच्यात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न या कॅम्पमधून करीत असल्याचे देऊस्कर म्हणाले.