पिंपरी, ता. १९ ः शैक्षणिक क्षेत्रातही एआय तंत्रज्ञान आत्मसात करण्याशिवाय पर्याय नाही. पालकांनी पाल्यांची अंगभूत कौशल्ये आणि क्षमतांचा विचार करूनच पुढील शिक्षणासाठी शैक्षणिक संस्था आणि अभ्यासक्रमाची निवड करावी. शिक्षणाला संस्कार आणि प्रॅक्टिकल प्रशिक्षणाची जोड दिल्यास चांगली युवा पिढी घडेल, असा विश्वास औद्योगिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे यांनी व्यक्त केला.
एएसएम संस्थेतील गुणवंतांचा सत्कारप्रसंगी पाचपांडे बोलत होते. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील (निवृत्त) एलआरओ डी. एच. कुलकर्णी, (निवृत्त) पॅरा फोर्स कमांडो रघुनाथ सावंत आणि डिफेन्स फोर्स लिगचे संचालक नीलेश विसपुते, दीप्ती जैन उपस्थित होते. एएसएमने गेल्या ४० वर्षात संगणकीय तंत्रज्ञानात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल्याचे सांगून सैन्यदल व पोलिसांचे पाल्य आणि एएसएम विद्यार्थ्यांसाठी सुमारे चार कोटी रुपयांच्या स्कॉलरशिपची घोषणा पाचपांडे यांनी केली.
कुलकर्णी म्हणाले, ‘‘देश प्रथम ही भावना प्रत्यक्षात आणण्यासाठी शिक्षणाबरोबर उत्तम संस्कार, आरोग्य आणि जातपात व धर्मापलीकडे जाऊन पिढीला घडविण्याची पहिली जबाबदारी पालकांची आहे. कोणत्याही आपत्कालीन प्रसंगाशी समर्थपणे मुकाबला करण्यासाठी प्रत्येकाने तन, मन, धनाने सज्ज राहिले पाहिजे.’’ पालक नीलेश महाजन, मोहम्मद मुजावर, नौदलात निवड झालेला सौरभ तिवारी आणि प्रीती जाधव, वीणा चौधरी या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. टास्क फोर्स कमिटीचे सदस्य डॉ. डी. डी. बाळसराफ यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे सरसंचालक डॉ. श्याम माथूर, शिक्षण तज्ज्ञ डॉ. सुधाकर बोकेफोडे, प्राचार्य डॉ. ललित कनोरे, प्रा. अर्चना वेदपाठक, प्रा. कविता उपलंचिवार, प्रा. अपर्णा मोरे, प्रा. मीनाक्षी सूर्यवंशी उपस्थित होते. शिक्षिका सर्जना तिवारी आणि शाहिन पानमळ यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्या अर्चना वेदपाठक आणि कविता उपलंचिवार यांनी आभार मानले.