Video: दिल्लीहून श्रीनगरकडे जाणाऱ्या विमानावर वीज कोसळली; फ्लाईटचा पुढचा भाग तुटला, प्रवाशांचा व्हिडीओ व्हायरल
esakal May 22, 2025 05:45 AM

नवी दिल्लीः दिल्लीहून श्रीनगरकडे जाणाऱ्या इंडिगो फ्लाईटला (6E-2142) भयंकर वादळी-वाऱ्याचा सामना करावा लागला. एवढंच नाही तर चक्क विमानाच्या पुढच्या भागावर वीज पडल्याने तो भाग क्षतिग्रस्त झाला. त्यामुळे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. एअरबस A320 मॉडेलच्या या फ्लाईटमध्ये २२७ प्रवाशी आणि कर्मचारी होते. सुदैवाने सर्व प्रवाशांना सुखरुप वाचवण्यात यश आलेलं आहे.

काश्मीर घाटीमध्ये विमान दाखल होताच वाऱ्याचा वेग वाढला. एवढंच नाहीत पाऊस सुरु झाला आणि विजांचा कडकडाट होत होता. त्यातच एक वीज थेट विमानावरच पडली. त्यामुळे फ्लाईटचं नोज सेक्शन क्षतिग्रस्त झालं. या विमानाला तात्काळ जवळच्या विमानतळावर लँड करावं लागलं. सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये प्रवाशी घाबरलेले दिसत आहेत.

इंडिगो एअरलाईन्सने या घटनेची पुष्टी करत म्हटलं की, आमच्या विमानाला खराब हवामानाचा सामना करावा लागला. श्रीनगर एअरपोर्टवर विमानाने इमर्जन्सी लँडिंग केलं. विमानाच्या पुढच्या भागात वीज पडल्याने नुकसान झालं आहे. प्रवाशांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वोच्च आहे. त्यामुळे सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलेलं आहे. हे विमान नादुरुस्त झाल्याने सेवेतून बाजूला करण्यात आलेलं आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुढच्या २४ तासांसाठी उत्तर भारतातल्या अनेक राज्यांना अलर्ट दिला आहे. वादळी वारे, वीज पडण्याची शक्यता आणि मुसळधार पाऊस कोसळेल, असं सांगण्यात आलेलं आहे. विशेषतः जम्मू-काश्मीरमध्ये पुढचे काही दिवस भूस्खलन आणि पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यामुळे संबंधित यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.