कागल : (सुधारित) 'नाना-नानी ऑक्सिजन पार्क' बनलं पर्यावरण रक्षणाचं आदर्श ठिकाण
esakal May 23, 2025 02:45 AM

08314

नाना-नानी ऑक्सिजन पार्क आकर्षण
कागलला उभारणी; बनलं पर्यावरण रक्षणाचं आदर्श ठिकाण

नरेंद्र बोते / सकाळ वृत्तसेवा

कागल, ता. २२ : कागल नगरपरिषदेने राबविलेल्या झिरो कचरा संकल्पनेतून साकार झालेले ‘नाना-नानी ऑक्सिजन पार्क’ हे आज शहरातील नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. कचऱ्याच्या दुर्गंधीतून सुटका करत, पर्यावरणपूरकतेचा आदर्श ठरलेले हे ठिकाण निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे.
अलीकडे पार्कमधील गुलमोहराच्या झाडांनी रंग उधळायला सुरुवात केली आहे. वर गर्द हिरवळ आणि त्यावर लालसर-केशरी फुलांनी भरलेली गुलमोहराची झाडं, तर खाली रस्त्यावर पडलेला फुलांचा सडा हे दृश्य पाहताना निसर्गरंगांची उधळण करत असल्याची जाणीव होते.
स्वच्छ भारत अभियान व पंधरावा वित्त आयोग यांच्या सहकार्याने नगरपरिषदेने प्रकल्प हाती घेतला होता. डेपोमधील कचऱ्याचे प्रमाण शून्यावर आणताना तो दुर्गंधीमुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. त्याचाच भाग म्हणून एक हजाराहून अधिक जंगली झाडांची लागवड केली. झाडे लावताना पूर्ण पाषाणात खड्डा काढताना कसरत करावी लागली. ब्लास्टिंग करून झाडांसाठी खड्डे तयार केले. गांडूळ खत, ठिबक सिंचन आणि सातत्यपूर्ण निगा यामुळे आज ही झाडे बहरली आहेत.
विद्यार्थ्यांसाठी हे ठिकाण शिक्षण आणि सहलीचे केंद्र बनले आहे. कचऱ्याचे वर्गीकरण, वीजनिर्मिती, गांडूळ खत, सुका कचरा वर्गीकरण व पुनर्वापराची प्रक्रिया प्रत्यक्ष पाहण्याची संधी इथे आहे.
कागल नगरपरिषदेचा हा उपक्रम पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि सौंदर्य यांचा आदर्श समन्वय साधणारा ठरत असून, जिल्ह्यातील इतर प्रशासनांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. गुलमोहराच्या फुलांनी नटलेला हा हरित प्रकल्प शहरवासीयांच्या मनावर निसर्गाचे रंग खुलवत आहे.

चौकट
कष्टाने यांनी जगविली झाडे
पालिकेचे मारुती हेगडे, राजेंद्र कांबळे तसेच किर्लोस्कर ऑईल इंजिन, लक्ष्मी फौंडेशन व संपूणार्थ लाईव्ह हुड कंपनीचे कर्मचारी घनकचरा व्यवस्थापनाचे काम पाहत उरलेल्या वेळेत पार्कमधील झाडे जगवली आहेत. यासाठी त्यांनी कामाची जबाबदारीही वाटून घेतली आहे.

कोट
गुलमोहर, कांचन, अर्जून, बहावा, लिंब, पाम, वड, पारिजात , चेरी, फणस, बदाम, उंबर, पेरू आदी वृक्षांनी हा नाना - नानी ऑक्सिजन पार्क बहरला आहे. नागरिकांनी या ऑक्सिजन पार्कला भेट द्यावी.
- अजय पाटणकर, मुख्याधिकारी, कागल

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.