रुग्णालयातील कामगारांचे प्रश्न तातडीने सोडवा
कामगार सेनेची अधिष्ठात्यांकडे मागणी
मुलुंड, ता. २२ (बातमीदार) : डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयातील कर्मचारी आणि कामगारांना गेल्या काही काळापासून भेडसावत असलेल्या समस्या अद्याप अनुत्तरित आहेत. याच पार्श्वभूमीवर म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने २१ मे रोजी कूपर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडे विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. कामगार सेनेकडून अधिष्ठात्यांकडे महत्त्वाच्या मागण्या सादर करण्यात आल्या. त्यामध्ये महाविद्यालयीन व रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचे प्रशासन थेट अधिष्ठाता किंवा वैद्यकीय अधीक्षकांच्या अखत्यारीत आणण्याची स्पष्टता करण्याची मागणी केली आहे. चतुर्थ श्रेणीतील ६५ टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असल्याने सध्याचे कर्मचारी प्रचंड ताणाखाली काम करीत आहेत. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणीही या वेळी करण्यात आली.
---------------------------
पदोन्नती द्या
पात्र कर्मचाऱ्यांना वेळेत पदोन्नती मिळावी, डीम परमन्सीचे आदेश त्वरित लागू करावे आणि औषधनिर्मिती, प्रयोगशाळा, नोंदणी, ईसीजी, शवविच्छेदन गृह, प्रशीतन इत्यादी विभागांतील रिक्त पदे त्वरित भरावीत, यावरही सेनेने भर दिला. तसेच नळ दुरुस्त करणारे, सुतार, गवंडी, पेंटर, नाभिक आणि स्वच्छतागृह चौकशी करणारे कर्मचारी यांच्या जागाही भरण्याची मागणी करण्यात आली.
---------------------------
सेवा अभिलेखातील अडचणी
कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्यामुळे त्यांचा वारंवार संप होत असून, त्याचा थेट परिणाम रुग्णालयातील स्वच्छतेवर होत आहे. याशिवाय २०१०-११ मधील थकीत ओटीसंबंधी खुलासा, परिचारिका, कक्ष सहाय्यक, शस्त्रक्रिया सहाय्यक व सिस्टर इनचार्ज यांच्या रिक्त पदांबाबत निर्णय तसेच पदोन्नती व सेवा अभिलेखातील अडचणी आजही प्रलंबित आहेत.
---------------------------
या अनेक मुद्द्यांमुळे कामगारांमध्ये असंतोष वाढत असून, आंदोलनाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येत्या सात दिवसांत तातडीची बैठक घेऊन समस्यांवर तोडगा काढावा, अशी आग्रही मागणी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी अधिष्ठात्यांकडे केली आहे.