अवसरी खुर्द येथे विद्यार्थिनींना स्वसंरक्षण धडे
esakal May 23, 2025 02:45 AM

मंचर, ता. २२ : अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील शासकीय अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात विश्व हिंदू परिषद मातृशक्ती व दुर्गावाहिनी मंचर प्रखंड यांच्या वतीने विद्यार्थिनी व प्राध्यापिकांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. या वेळी शिवकालीन युद्ध कलेचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. याप्रसंगी २५० विद्यार्थिनी व महिला प्राध्यापक उपस्थित होत्या.
स्वसंरक्षण या विषयावर विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन पुणे जिल्हा मातृशक्ती सहसंयोजिका मनीषा चासकर यांनी केले. दुर्गावाहिनी प्रखंड संयोजिका आदिती मोरडे व इतर दुर्गांनी शिवकालीन युद्धकलेचे प्रात्यक्षिके सादर केली. संयोजिका उज्ज्वला शिंदे यांनी सर्व शस्त्रांची माहिती सांगितली. या वेळी विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांना चासकर यांनी समर्पक उत्तरे दिली.

विद्यार्थिनी व महिलांवर वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण अत्यावश्यक झाले आहे. संकटसमयी धैर्याने सामोरे जाण्यासाठी आणि स्वतःचे रक्षण करण्यासाठी शाळा, महाविद्यालयांत स्वसंरक्षणाचे धडे देणे आवश्यक आहे. या उपक्रमामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल.
- मनीषा चासकर, सहसंयोजिका, मातृशक्ती पुणे जिल्हा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.