टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याला आता महिन्याभरापेक्षा कमी कालावधी बाकी आहे. टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. उभयसंघात एकूण 5 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटला अलविदा केला असल्याने टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात खेळणार आहे. नेतृत्वासाठी शुबमन गिल, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह या तिघांची नावं आघाडीवर आहेत. मात्र त्याआधी जसप्रीत बुमराह याने टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं आहे. माझं शरीर जास्त वर्कलोड सहन करु शकत नाही, असं बुमराहने बीसीसीआयला कळवलं आहे. बुमराह इग्ंलंड विरुद्ध 3 पेक्षा अधिक सामने खेळ शकत नाही, असा दावा मिडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे बीसीसीआय बीसीसीआय पर्यायी गोलंदाजाच्या शोधात आहे.तसेच बुमराह नसल्याने टीम इंडियाच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार हे निश्चित आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची 24 मे रोजी घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी निवड समितीसमोर अनेक आव्हानं आहेत. मालिकेसाठी कुणाला संधी द्यायची? असे अनेक प्रश्न निवड समिती आणि टीम मॅनेजमेंटसमोर आहेत. तसेच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जागी कुणाला खेळवायचं? हा देखील मोठा प्रश्न आहे. त्यात आता बुमराह सर्व सामने खेळू शकणार नसल्याने ब्लू आर्मीच्या अडचणीत वाढ झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉलिंग ग्रुपचं नेतृत्व करेन, पण काही सामने खेळू शकणार नसल्याचं बुमराहने सांगितलं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंग्लंड दौऱ्यासाठी कुणाला संधी द्यायची? यासाठी बैठक झाली. बुमराहने या बैठकीत तो 3 पेक्षा अधिक सामन्यात खेळू शकणार नसल्याचं सांगितलं. बुमराहने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतासाठी सातत्याने बॉलिंग केली. तसेच पाचही सामने खेळला. बुमराहला या दरम्यान पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात दुखापत झाली होती. बुमराहला पाठीच्या दुखापतीमुळे काही महिने क्रिकेटपासून दूर रहावं लागलं होतं. तसेच बुमराहवर शस्त्रक्रियाही झाली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा अनुभव पाहता निवड समिती खबरदारी म्हणून बुमराहला 3 सामन्यात खेळवणार की 5 सर्व सामने खेळण्यासाठी विनंती करणार? याकडे क्रिकेट वर्तुळाचं लक्ष असणार आहे.
जसप्रीत बुमराह याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनी कसोटी सामन्यादरम्यान पाठीला सूज आली होती. बुमराहला दुखापतीमुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला मुकावं लागलेलं. तसेच बुमराह आयपीएलच्या 18 व्या मोसमातील सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावं लागलं होतं. तसेच बुमराहवर 2023 साली पाठीच्या दुखापतीमुळे शस्त्रक्रिया करण्यात आली होती. बुमराहला तेव्हा जवळपास वर्षभर दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर रहावं लागलं होतं. त्यामुळे आता निवड समिती आणि टीम मॅनेजमेंट बुमराहबाबत काय निर्णय घेते? हे निर्णायक ठरणार आहे.