Satara News – साताऱ्यात धो-धो पाऊस, JCB च्या सहाय्याने पुरात अडकलेली वाहनं वाचवली!
Marathi May 23, 2025 10:28 PM

गेल्या चार दिवसापासून मान्सूनपूर्व पावसाने सातारा जिल्ह्याला झोडपून काढले आहे. पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. सातारा तालुक्यातील ग्रामीण भागातील चिंचणेर वंदन परिसरातील गावांमध्ये पावसामुळे ओढे नाले ओसंडून वाहत आहेत. ओढ्याला अचानक आलेल्या पुरामुळे बाजार पटांगणावर पाणी शिरले आणि पटांगणावर लावलेल्या चार ते पाच चार चाकी गाड्या पाण्यामध्ये अडकल्या. यावेळी ग्रामस्थ आणि जेसीबी चालक उमेश राठोड याच्या सतर्कतेमुळे तात्काळ जेसीबीच्या मदतीने सर्व वाहनं पटांगणावरून सुरक्षित स्थळी हलवली. यादरम्यान एक कार ओढ्यामध्ये आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून जाताना थोडक्यात वाचली. जेसीबी चालकाने या पटांगणावरील सर्व वाहने सुरक्षित स्थळी हलवल्यामुळे जेसीबी चालकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महाबळेश्वरमध्ये 93 मिलिमीटर पावसाची नोंद

सातारा जिल्ह्यात हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मागील चार दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे मे महिन्यातच अनेक भागात ओढ्या, नाले ओसंडून वाहू लागले आहेत. मिनी कश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये देखील पावसाचा जोर कायम असून शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत 93 मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान

सातारा जिल्ह्यात गेले चार दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतामध्ये पावसाचं पाणी साठून राहिल्यामुळे पीक धोक्यात आलं आहे. उन्हाळी भुईमूग तसेच टोमॅटो आणि भाजीपाला शेतातच सडून जाण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.