शितलवाडी : राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल नागपूरच्या वतीने रामटेक तालुक्यात बुधवारी (ता.२१)आपत्ती व्यवस्थापन जनजागृती व सराव यशस्वी पार पडला. सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत खिंडशी जलाशय येथे प्रशिक्षणार्थिंना आपत्ती व्यवस्थापन चमुचे( बचाव पथक ) एस.बी.चौधरी यांनी सखोल मार्गदर्शन केले.
आपत्ती व आणीबाणी परिस्थिती, धोके, आपत्तीचे प्रकार, घटना प्रतिसादप्रणाली यासारख्या संकल्पनांपासून सुरुवात केली. भूकंप, भूस्खलन, पूर, त्सुनामी, चक्रीवादळ, वीज पडणे अशा नैसर्गिक आपत्तींचे व्यवस्थापन तसेच कृत्रिम श्वासोच्छास तंत्र, चोकिंग, इमर्जन्सी लिफ्टिंग व हलविण्याच्या पद्धती, फायर सेफ्टी, जैविक, रासायनिक व आण्विक आपत्ती, गर्दी नियंत्रण, प्राथमिक उपचार, बँडेजिंग, स्ट्रेचर वापर अशा प्रत्यक्ष उपयुक्त बाबींचा समावेश होता. नैसर्गिक असो वा मानवनिर्मित आपत्ती कधी येईल हे सांगता येत नाही. आपत्ती निवारणासाठी सज्ज असण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रशिक्षणात उपविभागीय अधिकारी रामटेक प्रियेश महाजन, तहसीलदार, रामटेक रमेश कोळपे, अपर तहसीलदार पुनम कदम, पोलिस निरीक्षक आसाराम शेट्टे नायब तहसीलदार भोजराज बडवाईक, सारिका छात्रक, तसेच रामटेक तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी, सर्व तलाठी, सर्व कोतवाल, आपदा मित्र व इतर कार्यालयातील वेगवेगळया विभागाचे अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.
गॅस सिलिंडरची आग कशी विझवाल ?प्रशिक्षणार्थिंंना आगीचे प्रकार व आग विझविण्याच्या तंत्राचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. घरगुती गॅस सिलिंडरच्या स्फोटानंतर उद्भवणाऱ्या आगीला कसे आटोक्यात आणावे, याची प्रात्यक्षिके दाखविल्याने उपस्थितांना अत्यंत उपयुक्त ज्ञान मिळाले.ओबीएम रबर बोट,ईन्फाटेबल लाईट लाईफ जॅकेट लाईफ बाय प्रशिक्षणात मोटार बोट व टेन्टचा उपयोग पुरग्रस्त भागात कशी मोहिम राबवावी याचे खिंडशी जलाशयात प्रात्यक्षिक करुन धडे दिले.
या प्रशिक्षणात देवलापार आणि रामटेक तालुक्यातील महसूल, पोलिस, आरोग्य व महावितरण विभागाचे बचाव पथक, स्थानिक पोलिस दल, मंडळ अधिकारी, तलाठी, आपदा मित्र तसेच तालुक्यातील कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला