Covid19 Update : हवामान बदलाचे आरोग्यावर परिणाम; अकोल्यात श्वसन विकारांमध्ये वाढ, कोरोनाचा एकही रुग्ण नाही
esakal May 25, 2025 07:45 PM

अकोला : शहर व जिल्ह्यात मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे हवामानात झालेल्या बदलामुळे श्वसन विकारांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग, तसेच ‘सारी’ वॉर्डात दमा, न्यूमोनिया, फुफ्फुसाशी संबंधित श्वसनविकार, इन्फ्लुएन्झा, एच१एन१ व ‘जेएन वन’ या कोरोनासदृश व्हायरसने बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

मुंबई व पुणे शहरात कोरोना सदृश रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाला अलर्ट करण्यात आले असून, राज्य शासनाने वैद्यकीय यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. अकोल्यातील सुपरस्पेशालिटी रुग्णालयात ‘सारी’ वॉर्ड क्रियाशील ठेवण्यात आला आहे. औषधांचा पुरेसा साठा आणि ऑक्सिजन सिलिंडर्स उपलब्ध असून, आवश्यक त्या सुविधा तत्परतेने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

देशभरात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा ‘जेएन वन’ उपप्रकार आढळून येत आहे. याचे लक्षणे सौम्य असून, संसर्गाचा वेग तुलनेत कमी आहे. त्यामुळे घाबरून न जाता, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा, आजारी व्यक्तींच्या संपर्कात येणे टाळावे आणि वैयक्तिक स्वच्छता राखावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केले आहे. शहरासह जिल्ह्यात गेल्या आठवड्यांपासून कमी अधिक प्रमाणात पडत असलेल्या मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने श्वसनाच्या विकारांनी डोके वर काढले आहे. सर्वोपचार आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात आणि ‘सारी’ वॉर्डात दमा, न्यूमोनिया, फुफ्पुसाशी निगडित श्वसन विकार, इन्फ्लुएन्झा, एचवन एन वन, जेएन वन कोरोनासदृश व्हायरसने बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे.

ऑक्सीजनचा पुरेसा साठा

सर्वोपचार तसेच सुपरस्पेशालिटी रुग्णालयात ऑक्सीजन सिलिंडर सज्ज ठेवण्यात आले आहे. तसेच कोरोनासदृश श्वसनविकारावर प्रतिबंधक सर्व प्रकारचा औषधसाठा उपलब्ध असून, डॉक्टरांचे पथकही तैनात करण्यात आले आहे. रुग्णालयातील प्रयोगशाळेत कोरोनासदृश श्वसनविकारांची तपासणी सुरु आहे. जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही.

श्वसनविकारांवर त्वरित उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. मात्र, सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. रुग्णालयातील प्रयोगशाळेत कोरोनासदृश श्वसनविकारांची तपासणी सुरु आहे.

- डॉ. मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.