शांत आधारस्तंभ!
esakal May 31, 2025 08:45 AM

आर्ची सचदेव

प्रत्येकाच्या आयुष्यात आईचे खास स्थान असते. माझ्यासाठी माझी आई सगळं काही आहे! लहानपणापासूनच मला फारसे मित्र नव्हते; पण तरी कधी एकटेपणा जाणवला नाही. कारण, आयुष्यातील प्रत्येक चढउतारात आई माझ्याबरोबर होती. ती केवळ माझी आईच नव्हे, तर माझी बेस्ट फ्रेंड, माझी सगळ्यांत मोठी शिक्षिका आहे. माझ्याबद्दल विश्वास ठेवणारी व्यक्ती आहे.

मी सध्या ‘झी टीव्ही’वरील ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेत ‘पायल’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे. एक अभिनेत्री म्हणून माझ्या प्रवासात ती माझ्यामागे भक्कमपणे उभी आहे. ती माझं कौतुक करतेच, पण मला मार्गदर्शन करते. माझी स्वप्नं निडरपणे पूर्ण करण्यासाठी मला प्रेरणा देते.

आई जणू आमच्या कुटुंबाचा श्वासच आहे. अतिशय शांतपणे आणि ताकदीने सर्वांना एकत्र ठेवण्याची दुर्मीळ क्षमता तिच्यात आहे. माझ्या मते घरातील स्त्रीमुळेच घराला खरोखर घरपण येतं. माझ्या वडिलांना आणि मला आयुष्यात येणाऱ्या आव्हानांचा प्रेम आणि चिकाटी मनात ठेवून कसा सामना करायचा, हे तिनं शिकवलं. तिनं कायमच इतरांना स्वत:पेक्षा अधिक महत्त्व दिलं. दररोजच्या लहानमोठ्या समस्या सोडवणं असो किंवा केवळ घरात प्रेमाचं वातावरण कायम राखणं असो. ती सगळं सहजपणे करते. तिच्या असण्यानं आम्हीही कणखर आणि प्रेमळ झालो आहोत.

असं म्हणतात, की मुलांमध्ये आपल्या पालकांच्या गुणवैशिष्ट्यांतून बऱ्याच गोष्टी येत असतात. आपण त्यांची तत्त्वं आणि त्यांच्या आवडीनिवडीसुद्धा आत्मसात करतो. माझ्या वडिलांना अभिनय आणि नृत्य यांत रस आहे. तर माझ्या आईनं मला शिस्त, कलात्मकता आणि संस्कृती, यांची ओळख करून दिली. कलेवर आणि आयुष्य फुलवणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींवर तिचं मनापासून प्रेम आहे. मग ती पाककला असो किंवा मेंदी काढणं किंवा अन्य कुठलीही कला असो... मी सर्व तिला पाहून पाहूनच शिकले.

माझ्या आईमधील एक गुण मला सर्वाधिक आवडतो- ती म्हणजे तिची अथक सहनशक्ती. मला तडजोड करायला वेळ लागतो. काही वेळा माझा मनावरचा ताबा सुटतो आणि राग येतो. पण आई वादळातही शांत असते! कशीही परिस्थिती असली तरी ती त्याबरोबर जुळवून घेते. ती समोरच्याचं ऐकून घेते आणि तिच्या उपस्थितीनंच दुसऱ्याला शांत वाटतं. मला शांत कसं करायचं हे तिला पक्कं माहित आहे. तिची शांत, संयमी शक्ती माझ्यामध्ये असावी असं मला वाटतं.

आईबद्दल अनेक सुंदर आठवणी आहेत. मी जेव्हा हवाईसुंदरीच्या मुलाखतीसाठी तयारी करत होते, तेव्हाची एक आठवण माझ्या मनावर कोरली गेली आहे. छोट्या शहरात आणि एकत्र कुटुंबात वाढल्यामुळे करिअरसाठी घराबाहेर पडणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. माझ्या कुटुंबात असं करिअर करणारी मी पहिलीच मुलगी. त्याबद्दल शंका, प्रश्न आणि विरोधही होता. पण आई माझ्यामागे आधारस्तंभ म्हणून उभी राहिली. जेव्हा माझ्यावर कोणाला विश्वास नव्हता, तेव्हा तिने तो दाखवला. ती माझ्याबरोबर प्रत्येक मुलाखतीला आली, प्रत्येक आव्हानात तिने मला खंबीरपणे साथ दिली आणि कायमच मला माझ्या शक्तीची जाणीव करून दिली. आजही जेव्हा मी ‘कुमकुम भाग्य’च्या चित्रीकरणाहून अगदी १० तासांनंतर परतते, तेव्हा ती मला हालहवाल विचारते, मी काही खाल्लं आहे की नाही, आराम केला की नाही? अशी विचारपूस करते. मी लांब असले, तरी माझ्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तिच्या या प्रेमातच आहे़! तीच मला मिळालेला सर्वांत मोठा आशीर्वाद आहे.

( शब्दांकन : अरुण सुर्वे)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.