दक्षता पथकाला पाहताच खिडकीतून फेकली नोटांची बंडल्स
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
ओडिशाच्या ग्रामीण विकास विभागाच्या मुख्य अभियंत्याच्या घरात काट्यावधी रुपयांची रोकड सापडली आहे. दक्षता पथकाच्या छाप्यामध्ये मुख्य अभियंत्याच्या घरातून 2.1 कोटींची रोकड जप्त करण्यात आली. यावेळी पैसे मोजण्यासाठी 7-8 कर्मचाऱ्यांना तैनात करावे लागले. तसेच रोख रक्कम मोजण्यासाठी एक मशीन आणावी लागली. याचदरम्यान दक्षता पथकाच्या छाप्याची चाहूल लागताच सदर अभियंत्याने घराच्या खिडकीतून नोटांची बंडल्स फेकण्यास सुरुवात केल्याचेही निदर्शनास आले आहे.
मुख्य अभियंता बैकुंठनाथ सारंगी यांच्याविरुद्ध बेहिशेबी मालमत्तेची तक्रार ओडिशाच्या दक्षता पथकाला मिळाली होती. या आधारावर छाप्यासाठी 8 डीएसपी, 12 निरीक्षक आणि सहा सहाय्यक उपनिरीक्षकांची टीम तयार करण्यात आली. शुक्रवारी एकाचवेळी दक्षता पथकाने सारंगी यांच्या सात ठिकाणच्या मालमत्तांवर छापे टाकले. कारवाईदरम्यान मुख्य अभियंता भुवनेश्वरमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये होते. दक्षता पथकाच्या आगमनाची माहिती मिळताच त्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी फ्लॅटच्या खिडकीतून 500 रुपयांच्या नोटांचे गठ्ठे फेकण्यास सुरुवात केले. जप्त केलेल्या एकूण रोख रकमेपैकी भुवनेश्वरमधील फ्लॅटमधून 1 कोटी रुपये जप्त करण्यात आले. त्याचवेळी, अंगुलमधील त्यांच्या निवासस्थानातून 1.1 कोटी रुपये सापडले. छाप्यादरम्यान एवढी मोठी रोख रक्कम सापडणे हे भ्रष्टाचाराचे गंभीर प्रकरण आहे. दक्षता विभाग आता या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहे.