महिलेचे सव्वा दोन लाखांचे दागिने लुटले
esakal June 15, 2025 01:45 AM

नवी मुंबई, ता. १४ (वार्ताहर) : कुटुंबीयांसह रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील दोन लाख २० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र आणि सोनसाखळी लुटून नेल्याची घटना शुक्रवारी (ता. १३) रात्री खारघर सेक्टर-३५ ई भागात घडली. खारघर पोलिसांनी या लुटारूंविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
तक्रारदार पार्थीबन चंद्रशेखर (३२) हा खारघर सेक्टर-३५ मध्ये कुटुंबासह राहण्यास आहे. शुक्रवारी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास पार्थीबन हा पत्नी, मुलगा व आई कालीश्वरी (५५) या सर्वांना घेऊन नाष्टा करण्यासाठी जात होता. ते सर्व जण पायी चालत खारघर सेक्टर-३५ ई मधील स्टेट्स विहार सोसायटीसमोर आले. पार्थीबन हा काही अंतर पुढे चालत असताना, त्यांच्या पाठीमागून भरधाव दुचाकीवरून आलेल्या दोघा लुटारूंपैकी पाठीमागे बसलेल्या एकाने पार्थीबेन याच्या आईच्या गळ्यातील एक लाख ८० हजार रुपयांचे ६४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि ४० हजार रुपये किमतीची १६ ग्रॅम वजनाची सोनसाखळी खेचली. त्यानंतर दोघा लुटारूंनी पलायन केले. त्या वेळी कालीश्वरी यांनी आरडाओरड केल्यानंतर पार्थीबेन याने लुटारूंचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; मात्र दोघे दुचाकीवरून साई आयकॉन इमारतीच्या दिशेने पसार झाले. या घटनेनंतर त्यांनी खारघर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.