Mumbai Rain Update: पावसाने मुंबईला दिवसभर झोडपले, उद्या कसे असेल हवामान?
esakal June 17, 2025 06:45 AM

मुंबई : काल रात्रीपासून पावसाचा वाढलेला जोर आज दिवसभर कायम राहिल्याचे दिसून आले. पावसाने दिवसभर मुंबईला चांगलेच झोडपून काढले. या पावसामुळे बऱ्याच परिसरातील सखल भागात पाणी तुंबले असून रस्ते वाहतुकीला फटका बसला आहे. तसेच रेल्वे सेवाही विलंबाने सुरू होती. यामुळे सकाळी कामावर जाताना आणि आता कामावरून घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत.

आज सकाळपासूनच ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, रायगडच्या अनेक भागांमध्येही पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी महाराष्ट्रातील अंबा, कुंडलिका, पाताळगंगा या प्रमुख नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत. तसेच उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, आज शाळेचा पहिला दिवस असल्याने शाळेत पोहोण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांना चांगलीच कसरत करावी लागली. पावसाने संपूर्ण रात्रभर शहर आणि उपनगरांना झोडपून काढले. काल रविवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. यादरम्यान शहर ९५, पूर्व उपनगर ५८, तर पश्चिम उपनगरात ७५ मिमी पावसाची नोंद झाली.

मुंबईकरांचे हाल

त्यानंतर आज दिवसभर काही ठिकाणी मध्यम, तर काही ठिकाणी मुसळधार सरी सुरूच होत्या. यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामानिमित्त बाहेर पडलेल्या मुंबईकरांची चांगलीच धावपळ झाली. अंधेरी, सायन, गांधी मार्केट, भांडूप, घाटकोपर एलबीएस मार्ग, चेंबूर शेल कॉलनीमध्ये पाणी साचले. मानखुर्द, पवई, दादर टीटी, वांद्रे, धारावी, चुनाभट्टी, कुर्ला परिसरात ही काही काळ पाणी साचले होते.

उद्या कसे असेल हवामान?

कालपासून आज दिवसभर पावसाची संततधार कोसळत आहे. यादरम्यान कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांकरिता वर्तविलेल्या अंदाजानुसार, शहर व उपनगरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

झाडांची पडझड

दिवसभरात शहरात २ व पूर्व उपनगरात १ अशा एकूण ३ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. यात एकही जखमी झाला नाही. मुंबईत ३६ ठिकाणी फांद्या व झाडे पडल्या. यामध्ये अंधेरी पूर्व, अंधेरी कुर्ला रोड, अॅरेस्टल इमारत, ताकपाडा या ठिकाणी झाड पडून एक व्यक्ती जखमी झाली. मात्र त्याची प्रकृती स्थिर आहे.

भिंत पडण्याच्या घटना

संपूर्ण मुंबईत ८ ठिकाणी घराचा व इमारतीचा भाग, भिंत पडण्याच्या घटना घडल्या. जोगेश्वरी पूर्व येथे बांधकाम सूरू असलेल्या इमारतीच्या परांचीचा काही भाग पडून २ महिला जखमी झाल्या. उपचारार्थ त्यांना एचबीटी ट्रामा केअर, जोगेश्वरी पूर्व येथे दाखल करण्यात आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.