Amol Mitkari : मुख्यमंत्रीपदावरून अमोल मिटकरींचं मोठं विधान; उद्धव ठाकरेंवर स्तुतीसुमनांचा वर्षाव, तर शेलारांवर नाराजीचा सुर
esakal June 20, 2025 05:45 AM

अकोला - राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. आगामी आषाढी एकादशीनिमित्त त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाचं साकडं घालताना, ‘मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांना सपत्निक महापूजा करण्याचा मान मिळावा,’ अशी इच्छा व्यक्त केली आहे. सध्या महायुतीत मुख्यमंत्रीपदाबाबत अधिकृत चर्चा नसताना मिटकरींच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

आज अकोल्यातील आरोग्यनगर परिसरात मिटकरी यांच्या निवासस्थानी संत रूपनाथ महाराजांच्या पंढरपूर पालखीचे स्वागत करण्यात आले. या पालखीचं हे पहिलंच वर्ष असून, आ. मिटकरी यांनी पत्नीसमवेत पालखीचं पारंपरिक पद्धतीने स्वागत करत फुगडी घालून उत्सवात सहभाग घेतला. त्यांनी वारकऱ्यांसोबत अभंग गायनातही सहभाग घेतला.

याच वेळी त्यांनी 'विठ्ठलाच्या चरणी साकडं घालतो की, अजितदादा पवार यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची संधी लवकर मिळो', अशी प्रार्थना केली. मिटकरी यांचं हे वक्तव्य फारसं नवे नाही. याआधीही त्यांनी वेळोवेळी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या बाजूने आपली भूमिका मांडली आहे.

मात्र, आषाढी एकादशीसारख्या धार्मिक संदर्भात मुख्यमंत्रिपदाची चाहूल देणं, यामुळे महायुतीतील अंतर्गत समिकरणांवर परिणाम होण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी वर्तवली आहे. एकाच दिवशी मुख्यमंत्रिपदावर अजित पवारांच्या बाजूने साकडं, शेलारांवर नाराजी, तर उद्धव ठाकरेंवर स्तुती अशा तिहेरी राजकीय भूमिकांमुळे आमदार अमोल मिटकरी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यांच्या वक्तव्यांचा महायुतीतील अंतर्गत राजकारणावर काय परिणाम होईल, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

मित्रपक्षाच्या मंत्र्यावर नाराजी

महायुतीतीलच एक घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी भाजपचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक आणि चित्रपट विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही नाराजी व्यक्त करत म्हटलं आहे की, शेलार गेल्या तीन महिन्यांपासून भेटीचा वेळ देत नाहीत.

या तक्रारीवर प्रतिक्रिया देताना आमदार अमोल मिटकरी यांनीही आपल्यालाही असाच अनुभव आल्याचं स्पष्ट केलं. काही ठराविक सेलिब्रिटींना महिन्यातून तीनदा भेटणारे शेलार, मात्र मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यास वेळ का देत नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. येत्या पावसाळी अधिवेशनात यासंदर्भात शेलारांना जाब विचारणार असल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलं.

उद्धव ठाकरेंवर स्तुतीसुमन; ठाकरे गटाला विशेष शुभेच्छा

शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आमदार मिटकरी यांनी दोन्ही शिवसेनांना शुभेच्छा दिल्या असल्या तरी, ठाकरे गटाला उद्देशून त्यांनी विशेष स्तुतीपर शब्दांचा वापर केला. प्रबोधनकार ठाकरेंचा नातू आणि बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला उद्धव ठाकरेंबद्दल आपुलकी आणि आदर आहे, असं मिटकरी म्हणाले. त्यांनी उद्धव ठाकरे यांना आणखी बळ मिळावं आणि महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी मिळावी, अशा शुभेच्छाही दिल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.