ठाणे शहर, ता. २४ (बातमीदार)ः मुंब्रा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना अडीच वर्षांपूर्वी घडली होती. या प्रकरणात ठाणे पोक्सो न्यायालयाने तरुणाला वीस वर्षांची सक्तमजुरी, २० हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
मुंब्रा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या पीडिताला तिच्या परिसरात राहणारा अभिषेक जयस्वाल (वय २४) त्रास देत होता. १ नोव्हेंबर २०२२ रोजी अल्पवयीन मुलीवर त्याने लैंगिक अत्याचार केले होते. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणे येथील पोक्सो न्यायालयात सोमवारी (ता. २३) अंतिम सुनावणी झाली. विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी परिस्थितीजन्य पुरावे सादर केल्यानंतर ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. देशमुख यांनी अभिषेकला गुन्ह्यात दोषी ठरवले.