मुंबई : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर आता पक्षाकडून नव्या नेत्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पक्षाने भाजप नेते तथा आमदार रवींद्र चव्हाण यांना प्रदेश कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती. अखेर पक्षाने महाराष्ट्राचा नवा प्रदेशाध्यक्ष ठरवला आहे. रवींद्र चव्हाण यांना भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपकडून मुंबईत याचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी भाषण करताना आपल्या पक्षावर स्तुतीसुमने उधळली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा करण्यात आली. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी पक्षाचे आभार मानले.
रवींद्र चव्हाण भाषणात काय काय म्हणाले?
माझी सर्वांना विनंती आहे, कधीच रवीदादा आगे बढो किंवा रवी चव्हाण आगे बढो असं नाही, फक्त भाजप आगे बढो असंच म्हटलं पाहिजे. माझी आज या पदावर निवड झाली आहे. खरंतर भारतीय जनता पार्टीने मला हे पद देऊन माझ्यावर उपकार केले. मी हे सांगतोय कारण माझ्याबरोबर काम करणाऱ्या त्या त्या वेळेच्या असंख्य कार्यकर्त्यांना जाण आहे. माझी ओळख ही भारतीय जनता पार्टी आहे. मी काय होतो त्यावेळचा काळ आणि आज एवढ्या मोठ्या पक्षाच्या प्रमुख पदावर मला संधी दिली. मी २००२ साली पक्षाच्या कामाला सुरुवात केली. तिथून काम करत, एक सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता भाजपचा अध्यक्ष होतो हे कुठल्याच पक्षात होणार नाही. त्यामुळे हे माझ्यावर उपकार आहेत', असं रवींद्र चव्हाण म्हणाले.