भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाने जोरदार तयारी सुरु केली आहे. जसप्रीत बुमराह या सामन्यात खेळणार असल्याने भारताला दहा हत्तींचं बळ मिळणार आहे. असं असताना विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. कारण विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लंडनमध्ये आहेत. या जोडीने नुकतंच विम्बलडन 2025 स्पर्धा पाहण्यासाठी हजेरी लावली होती. यात विराट कोहली नोवाक जोकोविचला पाठिंबा देताना दिसला. मिडिया रिपोर्टनुसार, विराट-अनुष्का लंडनच्या सेंट जॉन्स वुड भागात राहात आहेत. विम्बलडन सामना लंडनच्या ऑल इंग्लंड टेनिस आणि क्रोकेट क्लबमध्ये खेळला जात आहे. हे विराट कोहलीच्या घरापासून खूपच जवळ आहे. त्यामुळे हा सामना पाहण्यासाठी तिथे गेला होता. त्यामुळे विराट कोहली टीम इंडियाचा सामना पाहण्यासाठी जाऊ शकतो.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सवर होणार आहे. हे मैदानही विराट कोहलीच्या घरापासून जवळच आहे. त्यामुळे विराट कोहली हा सामना पाहण्यासाठी येऊ शकतो, अशी आशा चाहत्यांना आहे. विराट कोहलीने नुकतंच कसोटी क्रिकेटला रामराम ठोकलं आहे. त्यामुळे विराट कोहली खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मैदानात हजेरी लावू शकतो. विराट कोहलीच्या चाहत्यांसाठीच नाही, तर खेळाडूंनाही यामुळे बळ मिळेल.
विम्बलडन 2025 स्पर्धेदरम्यान विराट कोहलीने स्टार स्पोर्ट्शी बोलताना सांगितलं की, ‘मला वाटते की कार्लोस अल्काराज आणि नोवाक अंतिम फेरीत पोहोचावेत आणि नोवाकने विजेतेपद जिंकावे, कारण त्याच्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर हे त्याच्यासाठी खूप मोठे असेल.’
विराट कोहली पुढे म्हणाला की, ‘वेगवेगळ्या खेळांमध्ये वेगवेगळी आव्हाने असतात. क्रिकेटमध्ये तुम्हाला बराच वेळ वाट पहावी लागते, तुम्ही सकाळी वॉर्म अप करता आणि नंतर परत येऊन ड्रेसिंग रूममध्ये वाट पाहता, कारण तुम्हाला माहित नसते की तुम्ही कधी फलंदाजी करणार आहात. तिथे बसून, खेळ वाचताना, परिस्थिती खूप वेगाने बदलते. टेनिसमध्ये, तुमच्याकडे कदाचित काही अटी असतात, तुम्हाला माहिती असते की तुम्ही काय करत आहात.’