मच्छीमार बांधवांच्या समस्यांकडे वेधले लक्ष
esakal July 09, 2025 12:45 AM

वसई, ता. ८ (बातमीदार) : वसईत मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारा असून, मासेमारीवर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू आहे; मात्र मच्छीमारबांधवांना अनेक समस्या भेडसावत आहेत. त्यांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात, नुकसानभरपाई देण्यात यावी, यासाठी पुरवणी मागणीवरील चर्चेत वसईच्या आमदार ॲड. स्नेहा दुबे-पंडित यांनी मत्स्यव्यवसायाबाबत सरकारचे लक्ष वेधले.

वसई पाचूबंदर, अर्नाळा, नायगाव येथे मच्छीमारबांधवांसाठी आधुनिक व सुसज्ज मच्छीमार्केट उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना व्यवसाय करण्यासाठी मच्छी मार्केट उभारण्यात यावे, तर पाचूबंदर क्षेपणभूमी बंद झाल्यानंतर त्या जागेचा योग्य वापर करीत मत्स्यव्यवसाय करणाऱ्या युवा पिढीसाठी अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यात यावे आणि नोव्हेंबरमधील अवकाळी पावसामुळे मच्छीमारबांधवांचे नुकसान झाले आहे. अशा एक हजार मत्स्यव्यावसायिकांना ५६ लाख ५४ हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळावी, यासाठी पाठपुरावा करीत मागणी केली. अर्नाळा, पाणजू, पाचूबंदर आणि नायगाव येथील जेट्ट्यांचे नूतनीकरण तातडीने करण्यात यावे, अशी मागणी सभागृहात करण्यात आली.

वसईच्या मच्छीमार समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी विधानसभेत विषय मांडल्याने याबाबत सरकार कोणता निर्णय घेणार, याकडे मच्छीमारबांधवांचे लक्ष लागले आहे.

वसईत मोठ्या प्रमाणात मत्स्यव्यवसाय केला जातो; मात्र त्यांना अद्ययावत सुविधा मिळाव्यात, त्यांचा व्यवसाय वाढावा, यासाठी मच्छीमार्केट, जेट्ट्यांचे नूतनीकरण, अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यात यावे, तसेच अवकाळी पावसांत झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी सरकारकडे केली.
- स्नेहा दुबे-पंडित, आमदार, वसई

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.