'चला हवा येऊ द्या' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; कॉमेडीचं गॅंगवॉर गाजणार
Tv9 Marathi July 09, 2025 03:45 PM

महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय विनोदी कार्यक्रम‘चला हवा येऊ द्या’पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तेसुद्धा नव्या आणि दमदार रुपात. प्रेक्षकांना आता कॉमेडीचं गँगवॉर अनुभवायला मिळणार आहे. हास्याचा एक भन्नाट महोत्सव साजरा होणार आहे, जिथे महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट विनोदवीर आपलं विनोदी कौशल्य सादर करतील. या नव्या सिझनमध्ये धमाकेदार स्किट्स, गँग लॉर्ड्समध्ये रंगलेली बोलीची स्पर्धा, खास सेलिब्रिटींची हजेरी आणि उत्साही प्रेक्षकांच्या सहभागासह एक हटके मनोरंजनचा तडका असणार आहे. प्रेक्षकांचे लाडके कलाकार श्रेया बुगडे, कुशल बद्रिके आणि भारत गणेशपुरे यांच्यासोबत दमदार हास्यकलाकार गौरव मोरे आणि अभिनेता-दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव मंचावर उतरणार आहेत.

हे सगळे विनोदवीर आता गँग लॉर्ड्सच्या भूमिकेतून नव्या कलाकारांना मार्गदर्शन करतील त्यांना प्रशिक्षित करतील आणि एक धमाकेदार विनोदी टीम तयार करतील. या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेता अभिजीत खांडकेकर सांभाळत आहे. त्याच्या उत्साही शैलीमुळे प्रत्येक भाग अधिक रंगतदार आणि मनोरंजक ठरणार आहे. प्रत्येक भागात गँग लॉर्ड्स म्हणजेच पाच मेंटॉर्सचं एक विशेष विनोदी सादरीकरण होईल, ज्याने प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल डोस मिळणार आहे. त्यासोबतच महाष्ट्रभरातून आलेले 25 विनोदी कलाकार महाराष्ट्राच्या मनोरंजनाचा विडा हाती घेणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

या नव्या सिझनचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी सूत्रसंचालक निलेश साबळे यांची कमतरता जाणवणार, अशाही भावना व्यक्त केल्या आहेत. तर भाऊ कदमसुद्धा या नव्या सिझनमध्ये हवा होता, असंही काहींनी म्हटलंय.

या नव्या पर्वाच्या लेखनाची जबाबदारी योगेश शिरसाट यांनी सांभाळली आहे. त्यासोबतच नव्या दमाचे होतकरू लेखक अनिश गोरेगावकर, अभिषेक गावकर, रोहित कोतेकर, अक्षय जोशी, पूर्णानंद वांढेकर आणि अमोल पाटील हेसुद्धा स्किट लिहिणार आहेत. ‘चला हवा येऊ द्या- कॉमेडीचे गँगवॉर’ हा कार्यक्रम नवा ताजेपणा देणारा आणि नव्या पिढीच्या विनोदी कलाकारांना मोठं व्यासपीठ देणारा एक अनोखा प्रयोग आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील प्रत्येक घरात विनोदाची नवी लाट घेऊन येणार आहे. येत्या 26 जुलैपासून शनिवारी आणि रविवारी रात्री 9 वाजता झी मराठी वाहिनीवर का कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.