‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली जोडी संजीव सेठ आणि लता सबरवाल लग्नाच्या 15 वर्षांनंतर विभक्त झाले. 21 जून रोजी लताने सोशल मीडियावर पोस्ट लिहित पतीपासून विभक्त झाल्याचं जाहीर केलं होतं. याबाबत संजीवने कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने लतासोबतच्या घटस्फोटावर मौन सोडलं आहे. “जे काही झालं, ते खूप दु:ख होतं, पण आता त्यावर मी रडत बसू शकत नाही,” असं संजीव म्हणाला. 2010 मध्ये लता आणि संजीव यांनी लग्नगाठ बांधली होती. संजीवचं हे दुसरं लग्न होतं. याआधी त्याने मराठी अभिनेत्री रेशम टिपणीसशी पहिलं लग्न केलं होतं.
‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत संजीव म्हणाला, “जे घडलं ते खूपच वाईट होतं. पण त्यावर मी रडत बसू शकत नाही. आयुष्य पुढे जात असतं आणि प्रत्येकाला त्यानुसार पुढे जावं लागतं. सध्या मी माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करत आहे. कामासोबतच मला माझ्या मुलांसोबत पुरेसा वेळ घालवायचा आहे.” लता आणि संजीव यांना एक मुलगा आहे. तर रेशम टिपणीसपासून त्याला दोन मुलं आहेत. संजीव आणि रेशम यांचा 2004 मध्ये घटस्फोट झाला होता.
संजीवसोबत घटस्फोट जाहीर करताना लताने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं, ‘बऱ्याच काळापासून मौन बाळगलं होतं. अखेर मी जाहीर करते की मी माझ्या पतीपासून विभक्त झाली आहे. मला एक प्रेमळ मुलगा दिल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. मी त्यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देते. मी सर्वांना विनंती करते की कृपया माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या शांतीचा आदर करा. याबद्दल कोणीही प्रश्न विचारू नका किंवा फोन करू नका.’ लता आणि संजीव यांची भेट ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. या मालिकेत दोघांनी अक्षराच्या आई-वडिलांची भूमिका साकारली होती. याच मालिकेत काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि 2010 मध्ये लग्न केलं.