Latest Maharashtra News Live Updates: मुंबईच्या दादर परिसरात सरकारी बँका सुरू; भारत बंदचा बँकिंग सेवेवर परिणाम नाही
esakal July 09, 2025 05:45 PM
Live: मुंबईच्या दादर परिसरात सरकारी बँका सुरू; भारत बंदचा बँकिंग सेवेवर परिणाम नाही

देशभरातील १३ कामगार संघटनांनी केंद्र सरकारच्या कामगार सुधारणा कायद्यांविरोधात भारत बंदची हाक दिली होती.

मात्र, मुंबईतील दादर परिसरात सरकारी बँका सुरळीतपणे कार्यरत आहेत आणि बँकिंग सेवांवर कोणताही परिणाम झालेला नाही.

मुंबईतून भारत बंदला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

Live: वर्धा जिल्ह्यात संततधार पावसाचा जोर कायम

वर्धा जिल्ह्यात कालपासून मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे.

मागील ४८ तासांपासून पावसाच्या सलग सरी जिल्ह्यातून कोसळत आहेत.\

जिल्ह्यातील ५४ पैकी ५० महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

सततच्या पावसामुळे नद्या व नाले तुडुंब भरले असून काही ठिकाणी पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

वर्धा, यशोदा, वणा, लाल नाला आणि पोथरा नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Solapur Live: वि. के. वयम् मध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त व्याख्यानाचे आयोजन

विवेकानंद केंद्र वेदांतिक ॲप्लिकेशन ऑफ योग अॅन्ड मॅनेजमेंट (वि. के. वयम्) तर्फे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुवारी, दिनांक १० जुलै रोजी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे व्याख्यान प्रणव नगरी, बॉम्बे पार्कजवळील वि. के. वयम् परिसरात संध्याकाळी ६ वाजता होणार असून, यामध्ये संगमेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रसाद कुंटे ‘गुरु महिमा’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमासाठी प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य असून, अधिकाधिक नागरिकांनी या प्रेरणादायी व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वि. के. वयम् संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

Live: गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाचा फटका; शेतकरी व नागरिकांचे हाल

गोंदिया जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या मुसळधार पावसाचा मोठा फटका शेतकरी आणि सामान्य नागरिकांना बसला असून, अनेक तालुक्यातील मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

देवरी तालुक्यातील मंगेझरी रस्त्यावर असलेला बेलार-गोंदी पुल सध्या दोन ते तीन फूट पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे प्रशासनाने सदर रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे.

परिणामी या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा फेरा घालावा लागत असून, जवळपास 30 किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करून देवरी शहर गाठावे लागत आहे.

या परिस्थितीचा फटका विद्यार्थ्यांनाही बसला आहे. अनेक विद्यार्थी शाळेत पोहोचू शकलेले नाहीत, काही ठिकाणी विद्यार्थ्यांना परत घरी पाठविण्यात आले.

या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचीही मोठी आर्थिक हानी झाली आहे. पेरलेली किंवा रोवलेली पिकं पाण्याखाली गेली असून, पुढील काही दिवस पावसाचा जोर असाच राहिल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Uddhav Thackeray Live : गिरणी कामगार मोर्चाला पाठिंबा : उद्धव ठाकरे

गिरणी कामगार मोर्चाला पाठिंबा असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले

Rahul Gandhi Live : बिहारमधील मतदार याद्यामध्ये फेरफार : राहुल गांधी

महाराष्ट्रप्रमाणे बिहारमधील मतदार याद्यामध्ये फेरफार झाला असल्याचे राहुल गांधी म्हणाले

Mumbai Live : कांदिवलीत एटीएम सेंटरला लागली आग

कांदिवलीत एटीएम सेंटरला लागली आग

कांदिवली पूर्वेकडील ठाकूर व्हिलेज मधील कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएम ला लागली आग

ठाकूर व्हिलेज मधील इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या एटीएम सेंटरमध्ये ही आग सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास लागली

मुंबई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू

Bhiwandi Live Updates: भिवंडीत परप्रांतीय रिक्षाचालकाची मराठी तरुणाला मारहाण; मनसेच्या हस्तक्षेपाने माफी मागायला लावली

भिवंडी बायपास येथून प्रवासी म्हणून बसलेल्या एका मराठी तरुणासोबत झालेल्या किरकोळ वादातून परप्रांतीय रिक्षा चालकाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारानंतर मनसेने ठाम भूमिका घेतली असून, भिवंडी शहराध्यक्ष मनोज गुळवी यांच्या मध्यस्थीमुळे संबंधित परप्रांतीय रिक्षा चालकाला माफी मागायला लावण्यात आली.

Rain Live Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर जिल्हाधिकारी, नागपूर महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांकडून जिल्ह्यातील पावसाचा आढावा घेतला

जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर जिल्हाधिकारी, नागपूर महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांकडून आढावा घेतला. सद्या परिस्थिती नियंत्रणात आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ चमू सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आज जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर केली आहे. नागरिकांनी सुद्धा सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Rain Live Updates: विदर्भातील गोंदिया, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता

विदर्भातील गोंदिया, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. खबरदारी घ्या - आरएमसी नागपूर (आयएमडी)

Pune Live Updates: पुण्यातील रेल्वे स्थानकासमोरील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या सुरज शुक्लाविरोधात पुण्यात दुसरा गुन्हा दाखल
  • पुण्यातील रेल्वे स्थानकासमोरील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या सुरज शुक्लाविरोधात पुण्यात दुसरा गुन्हा दाखल

  • पहिला गुन्हा बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे तर दुसरा गुन्हा आता शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे.

  • आरोपीला अटक करून न्यायालयाच्या समोर हजर केल्यानंतर आरोपीने न्यायाधीशाच्या अंगावर धावत जाऊन कोर्टाने बांगड्या घातल्या आहेत काय आम्ही बांगड्या घातल्या नाहीत असे म्हणून न्यायालयाचा अवमान केला होता.

Shrad Pawar Live: शिक्षकांच्या संघर्षाला शरद पवारांचा पाठिंबा; आझाद मैदानावर दिली हजेरी

आझाद मैदानावर सुरू असलेल्या विनाअनुदानीत शिक्षकांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दर्शवला आहे. आज ते थेट आंदोलनस्थळी पोहोचले आणि शिक्षकांच्या मागण्या ऐकून घेतल्या. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, "शिक्षकांच्या मागण्या न्याय्य आहेत, त्यासाठी संघर्ष करावा लागेल." याआधी कालपासूनच रोहित पवार हे देखील या आंदोलनात सहभागी असून शिक्षकांसोबत ठामपणे उभे आहेत. शिक्षण क्षेत्रातील अन्याय दूर करण्यासाठी सरकारने तत्काळ पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Solapur news live: सोलापुरात दहा हजार मुले शिकत आहेत तीन भाषा

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील 300 हून अधिक इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिलीपासूनच तीन भाषा शिकवण्याचा उपक्रम राबवला जात आहे. या शाळांमध्ये इंग्रजी, मराठी आणि तिसरी भाषा म्हणून हिंदी किंवा संस्कृत अशी त्रैभाषिक शिक्षणपद्धती आहे. विशेष म्हणजे, या शाळांमध्ये सध्या दहा हजारहून अधिक विद्यार्थी तीन भाषा आत्मसात करत आहेत. सीबीएसई, आयसीएसई आणि राज्य मंडळाच्या शाळांनी हे शिक्षण पद्धतशीरपणे राबवली आहे. पालकांचाही या त्रैभाषिक अभ्यासक्रमास भरघोस पाठिंबा मिळतो आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा भाषा विकास अधिक प्रभावीपणे घडतो आहे. मात्र, उर्वरित शाळांमध्ये केवळ दोन भाषा शिकवल्या जाणार असल्याने ही त्रैभाषिक संकल्पना सर्वत्र अमलात आणावी, अशी मागणी शिक्षण प्रेमींमधून होऊ लागली आहे.

Nashik Live News: गंगापूर व दारणा धरणांचा पाण्याचा विसर्ग कमी, गोदावरीच्या पातळीत घट होण्याची शक्यता

नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून आज सकाळी ९ वाजल्यापासून २२०५ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला असला, तरी त्यात घट करण्यात आली आहे. यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीतही लवकरच घट होण्याची शक्यता आहे. तसेच दारणा धरणातूनही पाण्याचा विसर्ग कमी करत तो ५४९८ क्युसेकपर्यंत खाली आणण्यात आला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, सध्या नाशिक जिल्ह्यातील १५ धरणांमधून पाण्याचा विसर्ग अद्याप सुरू असून, नागरिकांनी नदीकाठच्या भागांमध्ये सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Sanjay Raut Live : आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये भ्रष्टाचार, संजय राऊत यांचा आरोप

आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये भ्रष्टाचार सुरु असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Gujrat Live : आणंद-वडोदरा मार्गावरील पूल कोसळला अनेक वाहने नदीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू

गुजरातमध्ये मुसळधार पावसात पूल कोसळण्याची एक मोठी घटना समोर आली आहे. बुधवारी सकाळी आणंद आणि वडोदरा यांना जोडणारा गंभीरा पूल कोसळला. त्यामुळे अनेक वाहने नदीत पडली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला.

Marathwada Live : जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात २४ तासांत ६ टक्क्यांनी वाढ

मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा आज सकाळी ६३.१७ टक्के इतका झालाय. गेल्या चोवीस तासात धरणातील पाणीसाठ्यात तब्बल ६ टक्क्यांन वाढ झालीय. सध्या ५२ हजार ३४१ क्यूसेक इतकी आवक सुरू आहे. यावर्षीच्या पावसाळ्यातली ही सर्वात मोठी आवक आहे.

Pune Live : पुणे जिल्ह्यात धबधब्यांवर जाण्यासाठी आता शुल्क आकारणार

पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर जाण्यासाठी आता शुल्क आकारण्यात येणार आहे. धबधब्यांवर देखील हे शुल्क आकारले जाणार आहे, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Nagpur Live : नागपूरमध्ये मुसळधार पावसाने सखल भागांत पाणी साचले

पूर्व विदर्भात मुसळधार पावसामुळे जनजवीन विस्कळित झाले आहे. नागपूरमध्ये पावसामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.