भारत आणि इंग्लंड कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वीच विराट कोहलीने निवृत्तीचा खडा टाकला. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींना धक्का बसला होता. आयपीएल स्पर्धेदरम्यान रोहित शर्मानंतर विराट कोहलीने निवृत्ती घोषणा केली. 12 मे 2025 रोजी त्याने हा धक्कादायक निर्णय घेतला. अवघ्या 36व्या वर्षी विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे आश्चर्य वाटणं सहाजिकच होतं. आता विराट कोहलीने कसोटी निवृत्तीबाबत मजेशीर अंदाजात उत्तर दिलं आहे.गौरव कपूरने विराट कोहलीला निवृत्तीबाबत प्रश्न विचारला तेव्हा त्याने उत्तर दिलं. गौरवने विचारलं की सर्वजण तुला मैदानात मिस करत आहेत. तेव्हा त्याने उत्तर दिलं की, ‘मी माझी दाढी दोन दिवसांपूर्वीच रंगवली आहे. जेव्हा तुम्हाला प्रत्येक चार दिवसांनी दाढीला रंग करावा लागत असेल, तेव्हा समजून जा की वेळ आली आहे.’विराट कोहलीचं कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करण्याचं स्वप्न होतं. त्या टप्प्याच्या तो अगदी जवळ होता. पण त्यापूर्वीच त्याने निवृत्ती घेतली.
मुलाखतीवेळी विराट कोहलीजवळ रवि शास्त्रीही होते. तेव्हा दोघांनी एकमेकांप्रति सन्मान दाखवला. कोहलीने सांगितलं की, ‘प्रामाणिकपणे सांगायचं तर मी रवि शास्त्रीसोबत काम करत नसतो तर कसोटी जे काही आहे ते शक्य झालं नसतं. आमच्या सर्व काही स्पष्ट आहे, ते शोधणं कठीण आहे. प्रत्येक क्रिकेटपटूला करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी ही गोष्ट आवश्यक आहे. अनेक पत्रकार परिषदेत त्यांनी समोर येत प्रश्नांची उत्तरं दिली. गोष्टी वेगळ्या होऊ शकल्या असत्या आणि माझ्या मनात कायम त्यांच्या प्रती प्रेम आणि सन्मान असेल. कारण माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील ते मोठा भाग आहेत.’
युवराज सिंगने लंडनमध्ये त्याच्या युवीकॅन फाउंडेशन या चॅरिटी संस्थेसाठी आयोजित केलेल्या डिनर पार्टीला विराट कोहली उपस्थित होता. विराट कोहली व्यतिरिक्त सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, केविन पीटरसन, आशिष नेहरा असे इतर दिग्गज क्रिकेट स्टार या पार्टीला उपस्थित होते. गौरव कपूर यांनी आयोजित केलेल्या या डिनर पार्टी दरम्यान गप्पा मारण्याचे सत्र देखील आयोजित करण्यात आले होते.