हल्ली घाईच्या जीवनशैलीमुळे स्वयंपाकासाठी बाहेर तयार केलेल्या आले-लसूण पेस्ट वापरण्याचा कल वाढला आहे. पण नुकत्याच एफडीएच्या कारवाईमुळे एक धक्कादायक सत्य समोर आलं आहे. हैदराबादमध्ये तब्बल 7 हजार किलो भेसळयुक्त आले-लसूण पेस्ट जप्त करण्यात आली, जी कोणतीही FSSAI मान्यता न घेता तयार केली जात होती. या पेस्टमध्ये अस्वच्छता, कृत्रिम रंग आणि बंदी घालण्यात आलेल्या घटकांचा वापर होत होता. अशी पेस्ट चविष्ट दिसते, टिकाऊ वाटते, पण आरोग्यासाठी अत्यंत घातक असते. (ginger garlic paste fda health risks)
या पेस्टमध्ये मैदा, कॉर्नफ्लोअर, आणि कृत्रिम रसायने मिसळली जातात जे शरीरात गेल्यावर पचनक्रियेवर विपरित परिणाम करतात. अनेक वेळा अशा भेसळयुक्त पेस्टमुळे गॅस, अॅसिडिटी, डायरिया, अशा पचनाच्या समस्या होतात. दीर्घकाळ सेवन केल्यास यकृत आणि मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेवर त्याचा वाईट परिणाम होतो. काही लोकांना अॅलर्जी, त्वचेचे विकार, श्वसनाचे त्रास होऊ शकतात. अशा प्रकारची पेस्ट घेतल्यावर तोंडात जळजळ होणे, अन्न नीट न पचणे हे लक्षणं दिसू लागतात. त्यामुळे, घरगुती स्वच्छ पद्धतीने बनवलेली आले-लसूण पेस्ट वापरणेच अधिक सुरक्षित आहे.
आले लसूण पेस्ट वापरण्याआधी कोणती काळजी घ्यावी?
1) गुणवत्ता तपासा: पेस्टचा वास, रंग आणि टेक्शर तपासा. जर वास घेण्या जोग नसेल, रंग बदललेला असेल किंवा बुरशी दिसत असेल, तर ती वापरू नका.
2) सुरक्षित ब्रँड निवडा: चांगल्या प्रतीची आणि विश्वासार्ह ब्रँडची पेस्ट खरेदी करा.
3) घटक तपासा: पेस्टमध्ये वापरलेले घटक तपासा. त्यात अनावश्यक रंग किंवा संरक्षक (preservatives) असतील, तर ती वापरणे टाळा.
4) जास्त दिवस साठवलेली पेस्ट वापरू नका: जास्त दिवस साठवलेली पेस्ट वापरणे टाळा, कारण ती खराब होण्याची शक्यता असते.
5) पचनाच्या समस्या: भेसळयुक्त पेस्टमुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे वापरताना काळजी घेणे आवश्यक आहे.
घरी पेस्ट बनवण्याचे फायदे:
1) ताजेपणा: घरी बनवलेल्या पेस्टमध्ये ताजे आले-लसूण वापरले जातात, ज्यामुळे चव आणि सुगंध चांगला असतो.
2) सुरक्षितता: घरी बनवलेल्या पेस्टमध्ये भेसळ होण्याची शक्यता नसते, त्यामुळे ती आरोग्यासाठी सुरक्षित असते.
3) खर्च: घरी पेस्ट बनवणे, बाहेरून विकत घेण्यापेक्षा स्वस्त पडते.
बाहेरून आणलेली आले-लसूण पेस्ट वापरण्यापूर्वी, तिची गुणवत्ता आणि सुरक्षितता तपासा. शक्य असल्यास, घरीच पेस्ट बनवणे चांगले राहील, जेणेकरून तुम्हाला ताजे आणि सुरक्षित आले-लसूण पेस्ट मिळेल.