पुणे, ता. ९ ः गुरुपौर्णिमेनिमित्त सोमवार पेठेतील श्री त्रिशुंड गणपती मंदिराचे तळघर गुरुवारी (ता. १०) सकाळी सहा ते रात्री बारा या वेळेत खुले असणार आहे. यावेळी भाविकांना मंदिराच्या तळघरातील दलपतगिरी गोसावी यांच्या समाधीचे दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती श्री त्रिशुंड मयुरेश्वर गणपती विजय मंडळ ट्रस्टचे सचिन पवार यांनी दिली. ऐतिहासिक शिल्पवैभव असलेल्या श्री त्रिशुंड गणेश मंदिराची वास्तुशैली वेगळी असून वेरूळच्या कोरीव लेणीदृश्यात मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. या मंदिरातील ऐतिहासिक नोंदीनुसार, इंदूरजवळ असलेल्या धामपूर येथील संपन्न गोसावी भीमगिरजी यांनी २६ ऑगस्ट १७५४ मध्ये या मंदिराची निर्मिती केली. तळघरात जिवंत झरा असल्यामुळे येथे पाणी भरते. दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त तळघर स्वच्छ करून भाविकांसाठी खुले करण्यात येते.