काटेवाडी, ता. ९ : सुपे उपबाजार आवारात शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेतकरी भवनाच्या बांधकामाला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेंतर्गत साकार होणाऱ्या या प्रकल्पासाठी एकूण एक कोटी ५२ लाख ९५ हजार ८५० रुपये निधीचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार विशेष प्रयत्न केले होते.
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना निवास आणि मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शेतकरी भवन योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत ज्या बाजार समित्यांमध्ये शेतकरी भवन नाही, तिथे नवीन भवन उभारणे आणि जुन्या भवनांची दुरुस्ती करण्यासाठी शासन अनुदान उपलब्ध करून देत आहे. बारामतीच्या सुपे उपबाजारात नवीन शेतकरी भवन उभारण्याच्या प्रस्तावाला पणन संचालक, पुणे यांनी पाठपुरावा करून मंजुरी मिळवली आहे. या प्रकल्पासाठी बाजार समितीने तयार केलेल्या अंदाजपत्रकानुसार, बांधकामासाठी १ कोटी १९ लाख ६८ हजार ४७९ रुपये, रॉयल्टी खर्चासाठी १४ हजार ९३ रुपये, गुणवत्ता नियंत्रण चाचणीसाठी १ लाख ९ हजार ९७५ रुपये, जीएसटीसाठी २१ लाख ५४ हजार ३२६ रुपये, कामगार विम्यासाठी १ लाख १९ हजार ६८५ रुपये आणि विद्युतीकरणासाठी ९ लाख ५७ हजार ४७८ असे पाच टक्के अतिरिक्त खर्च असे एकूण १ कोटी ५२ लाख ९५ हजार ८५० रुपये खर्च अपेक्षित आहे. यापैकी ७६ लाख ४६ हजार रुपये शासन अनुदान म्हणून दोन टप्प्यांत वितरित केले जाणार असून, उर्वरित निधी बाजार समितीने स्वनिधी किंवा कर्जाद्वारे उभारणे अपेक्षित आहे.
भवनामुळे शेतकऱ्यांना आपली शेतीमाल विक्री करताना होणारा त्रास कमी होईल आणि त्यांना सुरक्षित आणि सुसज्ज निवासाची सोय उपलब्ध होईल. शेतकरी भावनाला मान्यता मिळाल्याबद्दल बाजार समितीचे सभापती विश्वास आटोळे, उपसभापती रामचंद्र खलाटे, सचिव अरविंद जगताप यांनी आभार मानले आहेत.
दृष्टिक्षेपात
प्रकल्प : सुपे उपबाजारात नवीन शेतकरी भवन बांधकाम
योजना : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन
एकूण खर्च : रु. १,५२,९५,८५०/-
शासन अनुदान : रु. ७६,४६,०००/-
बांधकाम कालावधी : प्रशासकीय मान्यतेपासून एक वर्षात पूर्ण
देखभाल खर्च : बाजार समितीने स्वतः उचलणे बंधनकारक