टॅक्सीचालकांच्या मनमानीला वेसण कधी?
esakal July 10, 2025 01:45 AM

टॅक्सीचालकांच्या मनमानीला वेसण कधी?
तीन दिवे लावण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ ः मुंबईकरांना घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर या प्रवासात टॅक्सीचालक अनेकदा भाडे नाकारतात. यावर उपाय म्हणून टॅक्सीवर हिरवा, लाल, पांढरा असे तीन दिवे लावण्याचा निर्णय १ फेब्रुवारी २०२० घेण्यात आला, मात्र एमएमआरटीए (मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण) बैठकीत त्याला सातत्याने मुदतवाढ मिळाली. साडेपाच वर्षे उलटूनही अद्याप दिवा लागलेला नाही.
१ फेब्रुवारी २०२० पासून नव्या टॅक्सीची नोंद करताना छतावर दिवे बसविल्याची खात्री करूनच गाडीची नोंदणी करावी, अशी अधिसूचना नोव्हेंबर २०१९ मध्ये सरकारने काढली होती. जुन्या टॅक्सीला छतावर दिवे बसवण्यासाठी वारंवार मुदतवाढ देण्यात आली, मात्र यावर पुढील निर्णय झालेला नाही. एमएमआरटीए अर्थात मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने वर्षभरापूर्वी आणखी मुदतवाढ दिली असून, हा दिवा लागणार कधी, टॅक्सीचालकांच्या मनमानीला वेसण लागणार कधी, असा सवाल मुंबईकर करत आहेत.

असे असतील तीन दिवे
टॅक्सीवर हिरवा, लाल आणि पांढरा असे तीन दिवे असतील. हिरवा दिवा सुरू असल्यास टॅक्सी भाडे घेण्यास उपलब्ध आहे, असे प्रवाशांनी समजावे, तर लाल दिवा असल्यास त्यात प्रवासी आहेत असे समजावे. त्याचवेळी पांढरा दिवा पेटता असेल, तर टॅक्सी सध्या भाडे स्वीकारण्यासाठी उपलब्ध नसेल, असा त्याचा अर्थ होईल. हे दिवे एलईडी असणार असून, प्रत्येक दिव्याचा अर्थ मराठी आणि इंग्रजीतून लिहिणे बंधनकारक असणार आहे, तर तिन्हीपैकी एक दिवा पेटता ठेवणेही गरजेचे असणार आहे.

नियमाने चालणाऱ्या टॅक्सीचालकांना अडचणीत आणले जात आहे. नवे नियम त्यांच्यावर लादले जात आहेत. टॅक्सीवर दिवा लावण्याची आवश्यकता नाही.
- के. के. तिवारी, अध्यक्ष भाजप रिक्षा-टॅक्सी सेल

टॅक्सीवर हिरवा, लाल आणि पांढरा असे तीन दिवे लावण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, लवकरच त्यावर निर्णय होईल.
- विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त

रात्रीच्यावेळी अनेकदा टॅक्सीचालक जवळचे भाडे नाकारतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. टॅक्सीवर दिवे लावल्यास टॅक्सी उपलब्ध आहे का हे आधीच समजेल. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल.
- अरुण गमरे, प्रवासी

मुंबई सेंट्रल आरटीओ
एकूण टॅक्सी - २६,५४४

वडाळा आरटीओ -
एकूण टॅक्सी- ८,२६३

अंधेरी आरटीओ -
एकूण टॅक्सी- ६,४१८

बोरिवली आरटीओ
एकूण टॅक्सी- १,६११

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.