तुळसुली कर्याद नारुर ठरले 'सुंदर गाव'
esakal July 10, 2025 01:45 AM

76409

तुळसुली कर्याद नारुर ठरले ‘सुंदर गाव’

शासनाकडून ग्राम पुरस्कार; ४० लाखांचे बक्षीस जाहीर

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ९ ः तुळसुली कर्याद नारुर (ता.कुडाळ) ही ग्रामपंचायत २०२३-२४ या आर्थिक वर्षात आर. आर. (आबा) पाटील स्मार्ट ग्राम पुरस्कार योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सुंदर गावाची मानकरी ठरली आहे. त्यासाठी ४० लाख रुपयांचे बक्षीस ग्रामपंचायतीला जाहीर झाले आहे. याबाबतची घोषणा मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी केली. या पुरस्काराने गावात आनंद व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागातर्फे राज्यातील ग्रामपंचायतींचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी स्मार्ट ग्राम योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. या योजनेअंतर्गत ‘आर. आर. (आबा) पाटील योजनेतून सुंदर गाव म्हणून जाहीर होणाऱ्या ग्रामपंचायतीला दहा लाख रुपये तर जिल्हा सुंदर गाव म्हणून जाहीर होणाऱ्या ग्रामपंचायतींना ४० लाख रुपये पारितोषिक देण्यात येते. स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक उर्जा व पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञान या आधारे ग्रामपंचायतीचे मूल्यमापन करून निवड केली जाते. यासाठी तालुकास्तर मूल्यमापन समिती तालुक्यातील एका ग्रामपंचायतीची निवड करते, तर आठ तालुक्यांतून आठ निवडलेल्या ग्रामपंचायतींमधून मूल्यमापन करून जिल्हा निवड समिती ‘जिल्हा सुंदर गावा’ची घोषणा करते.
ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांच्या समितीने जिल्हास्तरीय मूल्यमापन करून याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला होता. त्यानुसार श्री. खेबुडकर यांनी स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत २०२३-२४ चे आर. आर. (आबा) पाटील जिल्ह्यातील सुंदर गाव व तालुका सुंदर गावांची घोषणा केली आहे. तालुका व जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या बक्षीस रकमेतून शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे कामे करावी लागणार आहेत. जिल्हा सुंदर गावासाठी ४० लाख रुपये तर तालुका सुंदर गावांसाठी दहा लाख रुपये बक्षीस देण्यात येते. विभागून हा पुरस्कार दिल्यास प्राप्त होणारी रक्कम विभागून समप्रमाणात दोन्ही गावांना देण्यात येते. सर्व विजयी ग्रामपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी अभिनंदन केले आहे.
................
रक्कम खर्चासाठी निकष
तालुका अथवा जिल्हा सुंदर गाव म्हणून पुरस्कार जाहीर झालेल्या गावांना मिळणाऱ्या बक्षीस रकमेतून कोणत्या कामासाठी रक्कम खर्च करायची, याचे निकष शासनाने जाहीर केले आहेत. त्यानुसार प्राप्त होणारी बक्षीस रक्कम अपारंपरिक ऊर्जा संबंधी अभिनव उपक्रम, स्वच्छतेबाबत अभिनव उपक्रम, महिला सक्षमीकरण आणि मुलांना अनुकूल प्रकल्प, स्वच्छ पाणी वितरण प्रकल्प, भौगोलिक माहिती प्रणाली बसविणे, आंतरराष्ट्रीय मानदंड, मार्गदर्शक तत्वे, संकलन आणि तपासणी सूची तयार करून दर्जा वाढविण्यासाठी प्रकल्प राबविणे आदी कामांसाठी खर्च करता येणार आहे.
---
तालुका सुंदर ग्रामपंचायती
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून ‘तालुका सुंदर’ गावाची निवड केली आहे. यात कुडाळ तालुक्यातून निरुखे, मालवण-वराड, देवगड-बापर्डे, वेंगुर्लेपालकरवाडी आणि परबवाडी या दोन गावांची संयुक्त, दोडामार्ग-मणेरी, कणकवली-तरंदळे, वैभववाडी-उपळे आणि सावंतवाडी तालुक्यातून वेत्ये आणि आरोंदा या दोन्ही गावांची संयुक्त निवड केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.