इटलीची टी20 क्रिकेटमध्ये उलथापालथ, स्कॉटलंडला पराभूत करत वर्ल्डकपचं दार ठोठावलं
GH News July 10, 2025 02:05 AM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या पात्रता फेरीचा रोमांच वाढला आहे. आतापर्यंत 13 संघ स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. मात्र इतर 7 संघासाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धा भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. युरोपियन पात्रता फेरीत स्कॉटलंडला हरवून इटली विश्वचषकासाठी पात्रतेच्या उंबरठ्यावर उभी ठाकली आहे. युरोपियन पात्रता फेरीतील अव्वल 2 संघांना पुढील वर्षी होणाऱ्या टी20 विश्वचषकात खेळण्याची संधी मिळेल. या स्पर्धेतून टी20 विश्वचषकासाठी पात्रता मिळवण्यासाठी स्कॉटलंड आणि नेदरलँड्स हे सर्वात मोठे दावेदार मानले जात होते. परंतु इटलीच्या कामगिरीने या दोन्ही संघांपैकी सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. आतापर्यंत फुटबॉलमध्ये वर्चस्व असलेल्या देशात क्रिकेटने आपली मोहोर उमटवली आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींचा आनंद द्विगुणित झाला आहे. इटलीने सध्या तीन सामन्यांपैकी 2 सामन्यात विजय मिळून अव्वल स्थान पटकावलं आहे.

इटलीने टी20 पात्रता स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. संघाला स्कॉटलंडविरुद्ध शेवटचा सामना खेळायचा आहे. या सामन्यावर पुढचं सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. कारण स्कॉटलंड आणि नेदरलँडला अजूनही पात्र होण्याची संधी आहे. पण शेवटचा सामना इटलीने जिंकला तर टी20 वर्ल्डकपसाठी पात्र ठरेल. सध्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांग्लादेश, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज, आयर्लंड, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, दक्षिण अफ्रिका, अमेरिका आणि कॅनडा हे संघ ठरले आहेत.

अफ्रिका प्रादेशिक पात्रता फेरीत भाग घेणाऱ्या आठ संघांपैकी दोन संघ, आशिया/पूर्व आशिया-पॅसिफिक प्रादेशिक पात्रता फेरीत भाग घेणाऱ्या नऊ संघांपैकी तीन संघ, तर युरोपियन प्रादेशिक पात्रता फेरीत सहभागी होणाऱ्या पाच संघांपैकी दोन संघ टी 20 विश्वचषकात सहभागी होतील. युरोपियन प्रादेशिक पात्रता फेरीत ग्वेर्नसी, इटली, जर्सी, नेदरलँड आणि स्कॉटलँडचा समावेश आहे.

इटली आणि स्कॉटलँड सामना कसा झाला?

इटलीने नाणफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इटलीने 20 षटकात 6 गडी गमवून 167 धावा केल्या आणि विजयासाठी 168 धावा दिल्या. या धावांचा पाठलाग करताना स्कॉटलंडला 12 धावा कमी पडल्या. हातात विकेट असूनही हे लक्ष्य गाठता आलं नाही. स्कॉटलँडने 20 षटकात 5 गडी गमवून 155 धावा केल्या. या सामन्यात हॅरी जॉन्स मनेंती हा सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याने 4 षटकात 31 धावा देत 5 गडी बाद केले. तसेच 38 चेंडूत 38 धावा केल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.