मुंबईतील आझाद मैदानावर चार दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षकांचं आंदोलन सुरु होतं. आता या आंदोलनाला यश आलं आहे. सरकारने या शिक्षकांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी शिक्षकांनी भेट घेतली त्यानंतर बोलताना त्यांनी शिक्षकांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या असल्याची घोषणा केली. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
शिक्षकांच्या मागण्या मान्य
शिक्षकांच्या मागण्या मान्य केल्याची घोषणा करताना महाजन म्हणाले की, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारला तुमची काळजी आहे. आम्हाला माहिती आहे की, आपण सामान्य कुटुंबातील आहात. अतिशय धाडसी निर्णय फडणवीसांनी त्यावेळी घेतला. त्यानुसार, 20 टक्के, 40 टक्के त्यानंतर 60 टक्के दिले. मात्र सरकारी तिजोरीवरील आर्थिक संकटामुळं पुढचे टप्पे देण्यास उशीर झाला आहे. तुम्ही याबाबत वारंवार मागणी करत होतात.’
या तारखेला पगार मिळणार
पुढे बोलताना महाजन म्हणाले की, ‘आता तुमच्या पगाराचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. तुमच्या शिक्षकांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हे ठरलं की, आम्हाला तुमच्या खात्यात पगार टाकायचाच आहे. या दोन-तीन दिवसात सर्व तांत्रिक बाजू समजावून घेऊन, येत्या 18 तारखेला अधिवेशन संपल्यावर तुमच्या खात्यात पैसे आलेले असतील. यात कोणताही बदल होणार नाही.’
शिक्षकांच्या मागण्या काय होत्या?
राज्य सरकारने ऑक्टोबर 2024 मध्ये टप्पा अनुदान लागू करण्याची घोषणा केली होती. मात्र घोषणेनंतर प्रत्यक्ष निधी वितरित झालेला नाही. टप्पा अनुदानाचा निर्णय झाल्यानंतर दोन अधिवेशने झाली आहेत, तसेच तिसरे अधिवेशनही सुरु आहे, मात्र सरकारनं पुरवणी मागणी सादर केली नव्हती, त्यामुळे शिक्षकांनी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले होते, आता या आंदोलनाला यश मिळाले आहे.