Success Story : २२ व्या वर्षी 'सीए'; प्रणवकडून इच्छाशक्तीला प्रामाणिकपणे कष्टाची जोड
esakal July 10, 2025 09:45 PM

निरगुडसर : कोणतेही स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती व जिद्दीला आपल्या प्रामाणिक कष्टाची जोड दिल्यास आकाशालाही गवसणी घालता येते, हे पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) येथील शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या प्रणव सूर्यकांत पोखरकर याने वयाच्या २२ व्या वर्षी दाखवून दिले आहे. त्याने संपूर्ण देशात अवघड समजले जाणाऱ्या सीएची (सनदी लेखापाल) परीक्षा उत्तीर्ण होण्याची किमया केली आहे. त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

प्रणव हा पिंपळगाव खडकी येथील प्रगतिशील शेतकरी सूर्यकांत दामू पोखरकर यांचा मुलगा आहे. त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण महात्मा गांधी राजगुरुनगर या ठिकाणी झाले. तसेच, अकरावी व बारावीचे शिक्षण बीएमसीसी कॉलेज पुणे या ठिकाणी झाले. एम.कॉम.चे शिक्षण गरवारे कॉलेज पुणे येथे झाले. मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील प्रणव हा २२व्या वर्षी सीए झाला आहे.

पहिल्यापासून अभ्यासात हुशार असणाऱ्या प्रणव याची सीए होण्याची मनोमन इच्छा होती, ती त्याने त्याच्या कष्टाच्या आणि मेहनतीच्या जोरावर पूर्ण केली. या यशाबद्दल मंचर बाजार समितीचे संचालक अरुण शांताराम बांगर यांनी त्याला शुभेच्छा दिल्या. तसेच, ग्रामस्थांनी त्याची मिरवणूक काढून जोरदार स्वागत केले.

मला हे यश मिळवण्यासाठी आई आशा, वडील सूर्यकांत दामू पोखरकर, चुलते राजेश व संदीप आणि कुटुंबीयांकडून नेहमीच सकारात्मक पाठिंबा मिळाला. तसेच, सर्व शिक्षक आणि मित्र परिवाराकडून योग्य असे मार्गदर्शन मिळाले. त्यांचे मी आभार व्यक्त करतो. या सर्वांमुळेच एवढी अवघड परीक्षा मी उत्तीर्ण झालो.

- प्रणव पोखरकर

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.