नाशिकमध्ये टवाळखोरांकडून दहशत माजवण्यासाठी दगडफेक, विरोध करणाऱ्यावर धारदार शस्त्राने वार, रोकडह
Marathi July 18, 2025 03:25 PM

नाशिक गुन्हा: नाशिक शहरातील सातपूर (Satpur) परिसरात असलेल्या श्रमिकनगरमध्ये (Shramiknagar) आठ ते दहा टवाळखोरांनी सोमवारी रात्री उशिरा दहशत माजवण्याच्या उद्देशाने अचानकपणे दगडफेक केली. परिसरात शांतता भंग करणाऱ्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. (Nashik Crime News)

या हुल्लडबाज कृत्याला नागरिकांनी विरोध केला असता, टवाळखोरांनी संतप्त होऊन मधुकर थोरात या स्थानिक नागरिकावर धारदार शस्त्राने हल्ला केला. थोरात यांच्या खिशातील 15 हजार रुपयांची रोकड देखील या टोळक्याने लुटून नेल्याचं सांगण्यात येत आहे. हा हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जखमी मधुकर थोरात यांच्यावर नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास सुरू आहे.

नागरिकांचा संताप

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून श्रमिकनगर परिसरात टवाळखोरांचा संख्यात्मक उद्रेक झाला असून, हे लोक रात्री उशिरा दारूच्या नशेत गोंधळ घालतात, शिवीगाळ करतात आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. या संबंधी नागरिकांनी पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या, तरीही पोलीस प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या टवाळखोरांवर तातडीने कारवाई करून परिसरात शांतता आणि सुरक्षिततेचा वातावरण निर्माण करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मोबाईल चोरीच्या संशयावरून कोयत्याने हल्ला

दरम्यान, देवळाली कॅम्प परिसरातील हॉटेलमध्ये मोबाईल चोरीच्या संशयावरून वाद निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर कोयत्याच्या हल्ल्यात झाले. यात तिघांना दुखापत झाली असून, हॉटेलजवळील वाहनांची तोडफोडही करण्यात आली. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात सात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय किसन गोडसे (40, व्यवसाय हॉटेल व्यवसाय, रा. संसारी गाव, विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळ देवळाली कॅम्प) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना हौसन रोडवरील गुप्ता पेट्रोलपंपासमोर, व्यापारी बँकेच्या मागे असलेल्या पीस पीस नावाच्या हटिलमध्ये घडली. फिर्यादी यांच्या हटिलमध्ये आरोपी सिद्धांत गाडे, वैभव मोकळ, सुदर्शन माळी, विराज काळे, आदित्य जाधव, अभिषेक पांडे आणि साहिल गायकवाड हे जेवणासाठी आले होते.

जेवणानंतर बिल देऊन ते बाहेर पडत असताना त्यांनी चार्जिंग पॉइंटवर ठेवलेला एक मोबाईल काढल्याने फिर्यादी यांनी त्यांना मोबाईल का घेतला, असे विचारले. या प्रश्नावरून संतप्त होऊन त्यांनी शिवीगाळ केली व घमकी दिली. फिर्यादीचा भाऊ संदीप गोडसे याने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींपैकी एका व्यक्तीने बाहेरून कोयता आणून विजय गोडसे यांच्यावर वार केला. यामध्ये त्यांना किरकोळ दुखापत झाली. त्यानंतर संदीप गोडसे यांच्या डोक्यावर जबरदस्त वार करून गंभीर दुखापत केली. भांडण सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोकुळ उंबारडे यांच्या डोक्यावरही वार करण्यात आला.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Ahilyanagar Crime : वादाने केली सुखी संसाराची राख रांगोळी, आधी नवऱ्याने छातीवर वार करत स्वतःला संपवलं; नंतर बायकोनेही मारली इमारतीवरून उडी; अहिल्यानगर हादरलं

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.