अनेक दिवसांच्या चर्चेनंतर अखेर आशिया कप 2025 स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. एसीसी अर्थात आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी 25 जुलैला सोशल मीडियावर पोस्ट करत स्पर्धेच्या प्रमुख तारखा जाहीर केल्या होत्या. तसेच संपूर्ण वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाईल, अशी माहिती दिली होती. त्यानंतर अवघ्या काही तासांनी एसीसीने एक्स या सोशल मीडिया हँडलवरुन संपूर्ण स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.
एसीसीने दिलेल्या माहितीनुसार, 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान स्पर्धेचं यूएईमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. प्रत्येक संघ साखळी फेरीत 3-3 सामने खेळणार आहे. त्यानंतर दोन्ही गटातून अव्वल 2 संघ सुपर 4 साठी क्वालिफाय करतील.
त्यानंतर सुपर 4 मध्ये पोहचलेल्या एकाच गटातील 2 अव्वल संघांचा एकमेकांविरुद्ध 1 सामना (A1 vs A2) (B1 vs B2) होईल.तर त्यानंतर गटातील 1 संघ दुसऱ्या गटातील 2 संघांविरुद्ध प्रत्येकी 1-1 सामना खेळेल. त्यानंतर अंतिम फेरी आणि विजेता निश्चित होईल.
बहुप्रतिक्षित स्पर्धेत इंडिया आणि पाकिस्तान या 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघांना एकाच गटात ठेवलं आहे. ए ग्रुपमध्ये टीम इंडियासह, पाकिस्तान, यूएई आणि ओमानचा समावेश आहे. तर बी ग्रुपमध्ये श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग आहे.
19 सामने, 8 संघ आणि 1 ट्रॉफी
दरम्यान यंदा आशिया कप स्पर्धा टी 20I फॉर्मेटनुसार खेळवण्यात येणार आहे. आगामी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.