चाकण, ता. २६ : चाकण- शिक्रापूर, चाकण- तळेगाव मार्गावर रस्त्यावर वाहने खचण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ज्या कंपनीला काम दिले तो ठेकेदार साइडपट्ट्या, रस्त्यावरील खड्डे बुजवित नाही. तात्पुरती मलमपट्टी करतात. त्यामुळे हा धोका निर्माण झाला आहे. या मार्गांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीने केली आहे.
चाकणमधील महामार्गावर खड्डे पडलेले आहेत. तसेच, त्या खड्ड्यात पाणी साचले आहे. साइड पट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अवजड वाहने त्यात अडकली जात आहेत. अवजड वाहने काढण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागत आहे. दररोज आठ ते १० वाहने विविध मार्गावर साइड पट्ट्यांवर, तसेच मार्गावर खचत आहेत. चाकण- शिक्रापूर मार्गावर रासे फाटा मार्गावर झाड पडले होते, ते झाडही स्थानिक तरुणांनी बाजूला काढले. त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली. माणिक चौकाजवळ शिक्रापूर- मार्गावर रस्त्यावरील खड्ड्यात अडकलेली मोटार प्रशांत टोपे व इतर कार्यकर्त्यांनी बाहेर काढली.
वाहने खचण्याचे प्रमाण वाढले आहे हे नक्की आहे. रस्त्यावरील खड्डे व साइडपट्ट्या बुजविण्यासाठी संबंधित ठेकेदार कंपनीला सांगितले आहे. येत्या एक- दोन दिवसात खड्डे बुजविले जातील.
- दिलीप शिंदे, उपअभियंता, राजमार्ग प्राधिकरण