पाकिस्तानात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या एका महिन्यात पावसाशी संबिधित घटनांमध्ये 266 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात 126 लहान मुलांचाही समावेश आहे. तसेच 628 लोक जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे पाकिस्तानात शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे सर्वाधिक मृत्यू पंजाब प्रांतात झाले आहेत, या भागात 144 लोकांनी पावसामुळे जीव गमवावा लागला आहे. त्यानंतर खैबर पख्तूनख्वामध्ये 63, सिंधमध्ये 25, बलुचिस्तानमध्ये 16, पाकव्याप्त काश्मीरमध्ये 10 आणि इस्लामाबादमध्ये 8 लोकांचा मृत्यू झाला आहे. पावसाचा जोर अजूनही कायम असल्याने मदत आणि बचाव कार्यात अडथळा निर्माण होत आहे. गेल्या 24 तासांत 14 लोकांचा मृत्यू आणि 17 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
246 घरांचे नुकसान
मुसळधार पावसामुळे गेल्या 24 तासांत 246 घरांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आले आहे. तसेच या काळात 38 जनावरांचाही मृत्यू झाला आहे. तसेत पावसाळा सुरू झाल्यापासून 1250 पेक्षा जास्त घरांचे नुकसान झाले असून 366 जनावरे मृत्युमुखी पडली आहे. यामुळे सरकारची चिंता वाढली आहे.
अनेक ठिकाणी भूस्खलन
मुसळधार पावसामुळे तरबेला धरण भरल्यामुळे सिंधू नदीत पाणी सोडण्यात आले आहे, त्यामुळे अट्टोकमधील चच्च येथे गंभीर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच चिनाब नदीही दुथडी भरून वाहत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे अनेक रस्ते बंद होते अशी माहितीही समोर आली आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस
गेल्या काही दिवसांपासून स्वात आणि आसपासच्या भागात मुसळधार पाऊस पडत आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशातही नदीला आलेल्या पुरामुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तसेच 10 पेक्षा जास्त लोक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेऊन आहे अशी माहिती सरकारकडून देण्यात आलेली आहे.