Latest Maharashtra News Updates : मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे ओव्हरफ्लो, मोठ्या प्रमाणावर विसर्ग
esakal July 28, 2025 03:45 PM
Kolhapur News : नांदणी मठातला हत्ती गुजरातच्या वनतारात जाणार? सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

कोल्हापुरातील नांदणी मठातला हत्ती वनतारा इथं पाठवण्याची सूचना उच्च न्यायालयाने केलीय. या सूचनेच्या विरोधात मठाकडून सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आलीय. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे ओव्हरफ्लो, मोठ्या प्रमाणावर विसर्ग

शहापूर तालुक्यात आठवड्याभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. धरण क्षेत्रात मुसळधार पावसामुळे गेल्या आठवड्यापासून तिन्ही धरणाचे दरवाजे उघडले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सुरू आहे. मध्य वैतरणा धरणाचे पाच दरवाजे उघडले असून या मधून 3531 क्यूसेक ने पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर दुसरीकडे मोडकसागर धरणाचे दोन स्वयंचलित दरवाचे उघडले आहेत. यामधून 4756 क्यूसेक ने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Akkalkuwa : ८ किमी रस्ता नाही, गर्भवतीला बांबूच्या झोळीतून नेण्याची वेळ

अक्कलकुवा तालुक्यातील केवडी गावातील गर्भवतीला बांबूच्या झोळीतून रुग्णालयात न्यावं लागलं. केवडी गावापासून पांढरामाती गावापर्यंत जायला रस्ता नसल्यानं रुग्णांचे प्रचंड हाल होतात. सोतीबाई कालूसिंग तडवी वय 30 या गर्भवती महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी ८ किमी बांबूच्या झोळीतून नेण्याची वेळ आली. सुदैवाने वेळेत उपचारासाठी दाखल केल्यानं महिलेचे प्राण वाचले आणि मोठा अनर्थ टळला.

Raigad : पालमध्ये चोरट्यांचा ५ घरांवर दरोडा; रोकड, मोबाईलसह दागिन्यांची चोरी

रायगड जिल्ह्यातील सुधागड पाली परिसरात चार ते पाच चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकला आहे. कोयत्यांचा वापर करीत या चोरट्यांनी पाच घरांमध्ये दरोडा टाकला. तीन ठिकाणी साधारण 80 हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ज्या मध्ये सोन्याचा मंगळसुत्र, कानातले, रोख रक्कम आणि मोबाईल फोनचा समावेश आहे.

Pune News : पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसे घेणार पुणे पोलीस आयुक्तांची भेट

खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणात रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक झालीय. या प्रकरणी रोहिणी खडसे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेणार आहेत. सकाळी ११ वाजता पुणे पोलीस आयुक्तालयात रोहिणी खडसे या आयुक्तांच्या भेटीला जाणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हेसुद्धा असणार आहेत.

Pune Live : उजनी धरणातून 60000 क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

उजनी धरणाच्या सांडव्यातून विसर्ग आज सकाळपासून ६०००० क्युसेक पर्यंत वाढणार असून नदी काठच्या गावांना सतकर्तेचा इशारा देण्यात आला आहे.

Pune Live : पुण्यातील काळेपडळ भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड

पुण्यातील काळेपडळ भागात टोळक्याकडून 7 ते 8 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांत दहशत पसरली असून पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे.

Thane Live : ठाण्यातून घोडबंदरकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी

ठाणे-घोडबंदर मार्गावर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

Baramati News : बारामतीत आचार्य कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर; मुलगा, नातीच्या निधनामुळे वडिलांचाही मृत्यू

बारामती : शहरात रविवारी (ता. 27) झालेल्या भीषण अपघातात ओंकार राजेंद्र आचार्य व त्यांच्या दोन मुली मधुरा व सई यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दरम्यान, हा धक्का सहन न झाल्याने ओंकार यांचे वडील राजेंद्र श्रीनिवास आचार्य (वय 70) यांचे आज पहाटे निधन झाले. यामुळे आचार्य परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Kolhapur News : नांदणीतील 'महादेवी हत्तीण' प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, ८६५ गावांचे सुनावणीकडे लक्ष

जयसिंगपूर : नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्या ‘महादेवी हत्तीण’ प्रकरणी आज (ता. २८) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मठांतर्गत येणाऱ्या ८६५ गावांचे सुनावणीकडे लक्ष लागले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हत्तीणीला नेण्यासाठी काही दिवसांपासून जामनगर जिल्ह्यातील वनतारा राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टच्या विशेष हत्ती कल्याण केंद्राचे पथक दाखल झाले आहे. मात्र नागरिकांच्या विरोधामुळे हत्तीणीला नेणे शक्य झालेले नाही.

Suresh Warpudkar : मुहूर्त अखेर ठरला! माजी मंत्री सुरेश वरपुडकर मंगळवारी भाजपत करणार प्रवेश

परभणी : माजी मंत्री तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला असून मंगळवारी दुपारी ३ वाजता मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत वरपुडकर हे समर्थकांसह प्रवेश करणार आहेत.

Belgaum News : कन्नडसक्ती विरोधात ११ ऑगस्टला मोर्चा, मध्यवर्ती समितीच्या बैठकीत निर्णय

बेळगाव : कर्नाटक सरकारकडून सीमाभागात सुरू असलेल्या कन्नडसक्ती विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे ११ ऑगस्ट रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच येणाऱ्या काळात याविरोधात न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला असून, मोर्चामध्ये सीमाभागातील नागरिकांनी प्रचंड संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आज झालेल्या बैठकीत करण्यात आले.

Pune News : हिंदी सक्तीच्या विरोधानंतर शालेय अभ्यासक्रमात मोठे बदल

पुणे : हिंदी सक्तीच्या विरोधानंतर शालेय अभ्यासक्रमात मोठे बदल करण्यात आले. तिसरी ते दहावीपर्यंत तिसरी भाषा शिकण्याचे धोरण नवीन अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आले. राज्य सरकारने तिसरी ते दहावीसाठी शालेय शिक्षणाचा नवीन अभ्यासक्रम मसुदा तयार केला आहे. या अभ्यासक्रमात मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, कलाशिक्षण, व्यवसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण, पायाभूत मूल्य शिक्षणाचे विशेष समाविष्ट करण्यात आले आहेत.

Pune-Satara Highway : पुणे-सातारा महामार्गावरून जात असलेल्या कंटेनरला भीषण आग; कंटेनरच्या आगीने परिसरात धुराचे लोट

पुणे-सातारा महामार्गावरून जात असलेल्या कंटेनरला भीषण आग लागली. कंटेनरच्या आगीने परिसरात मोठे धुराचे लोट उसळले होते. पुण्यातील जांभुळवाडी पुलाजवळ ही घटना रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. अचानक लागलेल्या आगीमुळे महामार्गाची वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवले आहे. नेमकी आग कशामुळे लागली आणि यात कोणी जखमी झाले का? याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

Kolhapur Rain : पंचगंगेच्या पातळीत दोन फुटांची वाढ; इशारा पातळीकडे वाटचाल सुरू

कोल्हापूर : पावसाची रविवारी सकाळपासून रात्रीपर्यंत उघडझाप सुरू राहिली. दिवसभरात झालेल्या हलक्या व जोरदार सरींच्या पावसाने नद्या दुथड्या भरून वाहू लागल्या. यामुळे पंचगंगेच्या पातळीतही दिवसभरात दोन फुटांची वाढ होऊन इशारा पातळीकडे वाटचाल सुरू राहिली.

Bihar Election : बहिष्काराचा मार्ग आम्हाला खुला; बिहार निवडणुकीबाबत विरोधकांचा इशारा

Latest Marathi Live Updates 28 July 2025 : खराडी येथील एका उच्चभ्रू हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कथित रेव्ह पार्टीवर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने रविवारी पहाटे छापा टाकला. या कारवाईत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली. तसेच ‘‘बिहारमधील मतदारयादी पडताळणीच्या मोहिमेत (एसआयआर) अस्पष्टता असून विविध प्रकारच्या त्रुटी आणि संस्थागत अहंकारामुळे ही मोहीम संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा पर्याय विरोधी पक्षांसमोर खुला आहे,’’ असा इशारा विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीने दिला. 'एसआयआर’ मोहिमेला आक्षेप घेत एडीआर संस्था आणि विविध राजकीय पक्षांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पावसाची रविवारी सकाळपासून रात्रीपर्यंत उघडझाप सुरू राहिली. दिवसभरात झालेल्या हलक्या व जोरदार सरींच्या पावसाने नद्या दुथड्या भरून वाहू लागल्या. यामुळे कोल्हापुरातील पंचगंगेच्या पातळीतही दिवसभरात दोन फुटांची वाढ होऊन इशारा पातळीकडे वाटचाल सुरू राहिली. कर्नाटक सरकारकडून सीमाभागात सुरू असलेल्या कन्नडसक्ती विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे ११ ऑगस्ट रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. काळम्मावाडी (ता. राधानगरी) येथील दूधगंगा नदीवर असलेला राजर्षी शाहू सागर तलाव आज सांडव्याहून अधिक भरल्याने निर्धारित पातळीपर्यंत पाणी नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी दोन वाजता पाच वक्राकार दरवाजे एक फुटाने उचलण्यात आले. यातून २००० क्युसेक व पायथ्याच्या वीज गृहातून पंधराशे असा ३००० क्युसेक पाण्याचा विसर्ग दूधगंगा नदीपात्रात सुरू आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.