पुणे : ‘‘लाडक्या बहिणींचे मानधन कधीही बंद होणार नाही. ज्यांना मिळाले नाही, त्यांना इतर योजना कशाप्रकारे करता येतील, हे सरकार नक्की बघेल,’’ असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे म्हसोबा उत्सवाचे आयोजन मंडईतील बुरूड आळीत केले होते. त्यामध्ये यंदाचे भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी आमदार विजय शिवतारे, आमदार हेमंत रासने, लेखक शरद तांदळे, माजी नगरसेवक गणेश बीडकर, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव आदी उपस्थित होते.
यंदाचा व्यापार भूषण पुरस्कार चितळे बंधूचे संचालक संजय चितळे, उद्योग भूषण पुरस्कार आर. डी. डेव्हलपर्सचे संचालक नीलेश भिंताडे, कला भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, संगीत भूषण पुरस्कार गायक श्रीनिवास जोशी, धार्मिक भूषण पुरस्कार आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ आणि पत्रकारिता भूषण पुरस्कार संपादक आनंद अग्रवाल यांना प्रदान करण्यात आला.
सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, फळांची करंडी, महावस्त्र आणि श्रीफळ, असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमात सदगुरू बाळूमामा देवालय आदमापूरच्या कार्याध्यक्ष रागिणी खडके यांचा विशेष सन्मानित केला. वेंकीज उद्योग समूहाचे संचालक बालाजी राव आणि प्रकाश धारिवाल यांनी उत्सवाला विशेष मार्गदर्शन केले.