त्र्यंबकेश्वर: सण-उत्सवांची रेलचेल असल्याने सर्वांनाच श्रावण महिन्याचे नेहमीच अप्रूप वाटते. या महिन्यातील सोमवार तर भाविकांसाठी पर्वणीच मानली जाते. श्रावणातील पहिल्या सोमवार (ता. २८)निमित्त त्र्यंबकेश्वरनगरी व देवस्थान सज्ज झाले असून, दर्शनव्यवस्था तसेच ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
श्रावणातील पहिलाच सोमवार असल्याने मध्यरात्रीपासूनच ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची पावले त्र्यंबकेश्वरनगरीकडे वळणार आहेत. त्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे पहाटे चारला मंदिराचे पूर्व व उत्तर दरवाजे उघडण्यात येणार आहेत. पूर्व दरवाजातून सर्वांना दर्शनासाठी रांगेतून जाता येईल; तर उत्तर दरवाजाद्वारे २०० रुपये देणगीद्वारे दर्शन व स्थानिकांना ओळखपत्र वा रहिवासी असल्याचे आधारकार्ड दाखवून प्रवेश देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
काही कालावधीसाठी पश्चिम दरवाजा स्थानिक नागरिकांसाठी उघडा ठेवण्यात येणार आहे. भगवान त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भर पावसात येणाऱ्या भाविकांचा ओघ सुरूच असून, श्रावणी सोमवारचे औचित्य साधून दर्शन व ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी भाविकांच्या संख्येत कमालीची वाढ होत असते.
Shravan 2025: मनातल्या इच्छा राहिल्यात अपूर्ण? श्रावणी सोमवारी पुण्याच्या 'या' जागृत मंदिरांना द्या भेट!ही प्रदक्षिणा धार्मिक व निसर्गाचे रूप अनुभवण्यासाठी असल्याने कोणतेही गैरप्रकार त्या परिसरात न करता तसेच अमली पदार्थांचा वापर न करता प्रदक्षिणा पूर्ण करावी, असे आवाहन या वेळी सामाजिक संस्थांनी केले आहे. गर्दीचा ओघ पाहता या कालावधीत व्हीआयपी दर्शनाची सुविधा बंद ठेवण्यात आल्याचे देवस्थानने यापूर्वीच जाहीर केले. त्र्यंबकेश्वर शहर व परिसरात जादा पोलिस बंदोबस्त ठेवला असून, शहरातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियोजन करण्यात आले. वाहने व फेरीवाल्यांनी रस्ता अडवून भाविकांच्या दर्शनात व्यत्यय आणू नये, असे आवाहन सामाजिक संस्थांनी केले आहे.