खडसेंनी मला छळ छळ छळलं, पण त्यांच्या जावयावरील कारवाई म्हणजे हे राजकीय… अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया काय?
Tv9 Marathi July 28, 2025 03:45 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, ज्येष्ठ राजकारणी एकनाथ खडजसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना काल रेव्ह पार्टीदरम्यान पोलिसांनी अटक केली. त्या रेव्ह पार्टीमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्सही जप्त करण्यात आले.  यामुळे राज्यात मोठी खळबळ माजली आहे. नाथाभाऊंचा जावई रेव्ह पार्टीत सापडल्याने विविध चर्चांना उधाण आले. याच मुद्यावर आता, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वरून अचानक ऑर्डर आल्या म्हणून खडसेंच्या जावयावर अचानक रेड झाली. एवढं नक्कीच कळतं की ही साधीसुधी रेड नक्कीच नाही असं दमानिया म्हणाल्या. यामागे काही राजकीय षडयंत्र असल्याचा संशयही अंजली दमानिया यांनी व्यक्त केला.

खडसे महाजनांविरुद्ध बोलल्याने रेड पडली ?

कसं आहे की, खडसेंनी मला छळ छळ छळलं म्हणजे गेले कित्येक वर्ष ते मला इतका प्रचंड त्रास देतात. पण काल जेव्हा ऐकलं की त्यांच्या जावयावर अचानकपणे वरून ऑर्डर झाल्या म्हणून रेड झाली, तेव्हा नक्कीच एवढं कळलं की ही काही साधीसुधी रेड नक्कीच नाहीये. एकनाथ खडसे हे गेले काही दिवस गिरीश महाजन यांच्याविरुद्ध बोलतात म्हणून त्यांच्याविरुद्ध पोलीस लावले का असा संशय दमानिया यांनी व्यक्त केला. त्यांनी काय केलं हे त्यांचं त्यांना माहीत . आता प्रांजल केवलकर यांनी चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर त्यांना ती शिक्षा झालीच पाहिजे, त्याबद्दल काही दुमतच नाहीये. पण हे ज्या पद्धतीने झाल आहे, म्हणजे अगदी काही लोकांनाच अटक केली, त्यातील फक्त एकाचं नाव लीक होणं, त्याला रेव्ह पार्टी म्हणणं… खरं सांगायचं तर रेव्ह पार्टी म्हणजे शेकडोनी लोकं असतात, साऊंड असतो, डान्स असतो आणि मग त्यातच ड्रग्स आणि दारू असली तर त्याला रेव्ह पार्टी म्हटलं असतं. मला असं वाटतं की राजकीय षड्यंत्र आहे असा संशय अंजली दमानिया यांनी व्यक्त केला.

शिंदेंनी योगेश कदमांची पाठराखण केल्यानंतर दमानिया आक्रमक

दरम्यान गृहमंत्रालयाकडे ठाण्यातील 15 डान्सबारचे पुरावे दिले असं दमानिया यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदेंनी योगेश कदमांची पाठराखण केल्यानंतर दमानिया आक्रमक झाल्या आहेत. शिंदेंच्या ठाण्यात जे सुरू आहेत, त्यावर त्यांचं काय म्हणणं आहे असा सवालही दमानिया यांनी विचारला आहे.

एकनाथ शिंदे मागे एकदा अधिवेशनात म्हणाले होते की मी 50 डान्सबार बंद केले वगै,रे आताच्या घटकेला मी गृह मंत्रालयाकडे 15 डान्सबारची लिस्ट पाठवली जे सर्रासपणे ठाण्यात चालतात. त्याच्या व्हिडिओ सकट, डिटेल सकट मी हे गृहमंत्रालयाकडे पाठवलं होतं. आणि ते शिंदेंच्या ठाण्यात चालतात, एका वेळेस 40 ते 50 बायका नाचतात याचे व्हिडिओज देखील मी गृह मंत्रालयाकडे पाठवलेत. त्याचा उलगड सुद्धा आता होईलच, तिथे सुद्धा रेड झाल्यावर एकदा शिंदे काय बोलतात काय वागतात आणि खरी काय परिस्थिती आहे, ते सगळं जाहीरच होईल असं दमानिया म्हणाल्या.

तो परवाना रद्द करून नवीन काढणं गरजेचं होतं पण..

योगेश कदम जेव्हा मी पहिल्यांदा त्यांना भेटले मला खरंच तो माणूस व्यवस्थित वाटला. पण कसं आहे की वडिलांच्या काही मेहेरबान्यांमुळे अनेक गोष्टी होत असतात, तर सावली बार मध्ये मी जेव्हा जाऊन तिथला परवाना बघितला, एफआयआर वाचला, त्याच्या ज्योती कदम यांच्या नावाने परवाना आहे. हा परवाना असताना जर त्याला कोणाला द्यायचं होतं तर तो परवाना रद्द करून नवीन काढणं गरजेचं होतं. त्यांनी केलं नाही आणि कंटिन्यूएशन केलं, ज्याला आपण कंटिन्यू अग्रीमेंट म्हणतो. हे दुसऱ्याच्या नावाने करता येत नाही अशी मला वकिलांनी माहिती दिली आहे. या व्यतिरिक्त सुद्धा माहिती माझ्याकडे आलेली आहे आणि त्याच्यावर मी काम करते ते उघड झाल्यानंतर मी बाकीचे डिटेल्स बाहेर काढीन, असा इशारा दमानिया यांनी दिला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.